एका छोट्या विषाणूने सध्या साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. भारतासह देशभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. सर्व क्रीडापटू आणि त्यांचा सहाय्यक कर्णचारी वर्ग आपापल्या घरी विश्राम घेत आहे. अशा कसोटीच्या काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी क्रीडापटू वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत आहेत. त्यातील एक म्हणजे जुने फोटो पोस्ट करण्याचा एक ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी हा ट्रेंड फॉलो केल्याचे दिसत आहे.

युवराज सिंग ने एक जुना फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज क्रिकेटपटू एका रांगेत टेलिफोन बूथ वर उभे राहून आपल्या घरच्यांशी संपर्क साधताना दिसत आहेत. युवराजने शेअर केलेला फोटो खूप जुना आहे. युवराजने या फोटोच्या कॅपशनमध्ये मजेशीर वाक्य लिहिलं आहे. “जेव्हा तुम्ही वाईट खेळ करता आणि तुमचे पालक तुमच्या मोबाईलमध्ये पैसे भरत नाहीत तेव्हा अशी अवस्था होते. मोबाईल जवळ नसतानाचे ते दिवस…” असं त्याने फोटोबद्दल लिहिलं आहे आणि त्यात वीरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा, व्ही व्ही एस लक्ष्मण यांना टॅगही केलं आहे.

दरम्यान, सुरूवातीला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू रवी बोपारा याने स्वत:चा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता, नंतर चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही भारतीय क्रिकेटर्स एकत्र असलेला एक जुना फोटो शेअर केला. भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यानेही रोहित शर्मा आणि रैनासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला. त्यानंतर मास्टरब्लास्टर सचिनला देखील आपला जुना फोटो शेअर करण्याचा मोह आवरला नव्हता. १९९२ मध्ये इंग्लंडच्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत सचिन यॉर्कशायर संघातर्फे खेळला होता, तेव्हाचा फोटो त्याने शेअर केला.

डावखुरा सलामीवीर शिखर धवन यानेही सुरूवातीला रैनासोबतचा एक जिममधला जुना फोटो शेअर केला होता. त्यावर त्याने रैना आणि स्वत:ला पैलवान संबोधलं होतं. त्यानंतर त्याने एक झकास गॉगल लावलेला आणि काळा शर्ट, निळी डेनिम जिन्स घातलेला फोटो शेअर केला होता. आणि दोनच दिवसांपूर्वी धवनने आपला आणि आपल्या मुलाचा फोटो शेअर केला. ‘मुलगा आणि वडील यांच्या दिसण्यात फार वेगळेपण नसते’, अशा आशयाचे कॅप्शनही त्याने फोटोला दिले होते.