मैदान असो किंवा ड्रेसिंग रुम, भारतीय क्रिकेटपटूंचा एकमेकांशी असलेला जिव्हाळा प्रत्येकाला माहिती आहे. अनेक वेळा सोशल मीडियावरही याचा प्रत्यय येतो. विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह सारखे खेळाडू अनेक वेळा आपल्याच सहकाऱ्यांची चेष्टा करत आपल्या सर्वांना एकमेकांमधले जिव्हाळ्याचे संबंध दाखवून देतात. भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेललाही इन्स्टाग्रामवर युवराज सिंहच्या अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
१५ वर्षांपूर्वी सौरव गांगुलीसोबत खेळत असतानाचा फोटो पार्थिवने आपल्या इन्स्टाग्रामवर टाकला होता. यावर अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या. मात्र युवराज सिंहने पार्थिवच्या फोटोवर “तू गांगुलीचा मुलगा शोभतोयस”, अशी कमेंट केली आहे. युवराजच्या या आगळ्या वेगळ्या ट्रोलिंगला त्याच्या चाहत्यांनीही चांगलीच दाद दिली आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे, पार्थिव पटेल आणि युवराज सिंह या दोघांनीही सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केलं होतं. संघातील तरुण खेळाडूंचं भवितव्य घडवण्यात सौरव गांगुलीचा महत्वाचा वाटा आहे. पार्थिव आणि युवराज हे दोन्ही खेळाडू याचंच उदाहरण आहेत. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पार्थिव पटेलने २००२ साली इंग्लड दौऱ्यात कसोटी संघातून पदार्पण केलं होतं.