नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये अविनाश साबळेने भारतासाठी रौप्यपदक जिंकले. याच साबळेने २०१८ मध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम रचला. त्याच्या अलौकिक यशामागे दिवंगत प्रशिक्षक आणि प्रेरक निकोलाइ स्नेसारेव्ह यांचा खऱ्या अर्थाने वाटा होता. अविनाश या कामगिरीनंतर त्यांना वंदन करण्यास विसरला नाही.

साबळेने गेल्या चार दशकांचा गोपाल सैनी यांनी स्थापित केलेला राष्ट्रीय विक्रम ८:२९.८० सेकंद वेळ नोंदवत चार वर्षांपूर्वी मोडीत काढला. ही कामगिरी करूनही त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. ‘‘मी यापेक्षा उत्तम कामगिरी करेन, याबाबत खात्री नव्हती. मी ८:२९ सेकंद वेळ नोंदवली. हीच वेळ पुन्हा नोंदवेन, याचा विश्वास मला नव्हता. अनेक अ‍ॅथलेटिक्सपटूंनी ८:३५, ८:३६ सेकंद अशा वेळा नोंदवल्या आहेत. मात्र त्यांनीही ही कामगिरी केल्यानंतर त्याची पुनरावृत्ती केली नाही,’’ असे साबळे म्हणाला.

गतवर्षी मार्चमध्ये बेलारूसच्या स्नेसारेव्ह यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारताच्या लांबपल्ल्यांच्या धावपटूंना धक्का बसला होता. स्नेसारेव्ह टोक्यो ऑलिम्पिकसाठी साबळेला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. ५ मार्चला पतियाळाच्या राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील खोलीत ते मृतावस्थेत आढळले.

साबळेला किर्गिस्तानमधील सराव शिबिराला जाता आले नाही. त्यानंतर स्नेसारेव्ह यांनी टोक्यो ऑलिम्पिकपर्यंत आपला करार मोडीत काढून २०१९ मध्ये माघार घेण्याचा निर्णय घेतला. टोक्यो ऑलिम्पिकआधी साबळेने आपले सेनादलाचे प्रशिक्षक अमरिश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला. साबळेच्या हृदयात स्नेसारेव्हला वेगळे स्थान होते.

‘‘प्रशिक्षक म्हणून निकोलाइ यांनी माझ्यासाठी जे केले, ते मी विसरणार नाही. माझ्या आयुष्यात अनेक प्रशिक्षक आले आणि अनेकांनी मला काही सकारात्मक गोष्टी शिकवल्या. निकोलाइ यांनी माझा दृष्टिकोन बदलला. मी त्यांच्यासारखा प्रामणिक प्रशिक्षक पाहिला नाही. त्यांचे अकाली जाणे माझ्यासाठी कठीण काळ होता. त्यानंतर मी अस्वस्थही झालो,’’ असे साबळेने सांगितले.

कडक प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ, स्वयंपाकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्नेसारेव्ह २००५ मध्ये पहिल्यांदा भारतात आले होते. पाच वर्षांनी प्रीजा श्रीधरन आणि कविता राऊत यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील १० हजार मीटर प्रकारात अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. याच स्पर्धेत सुधा सिंगने स्टिपलचेसमध्ये सुवर्ण कामगिरी केली. जे खेळाडू स्नेसारेव्ह यांचा सराव कार्यक्रम प्रामाणिकपणे करण्याच्या तयारीत होते, त्या खेळाडूंनाच स्नेसारेव्ह मार्गदर्शन करत असत. स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडू एकमेकांशी बोलायलाही घाबरायचे इतका स्नेसारेव्ह यांचा दरारा होता.  ते खेळाडूंसाठी चांगले जेवण बनवायचे. ते खेळाडूंसाठी प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ यांसारख्या अनेक भूमिका पार पाडायचे. खेळाडू जे काही खायचे त्यावर त्यांची नजर असायची.