Chris Woakes Ruled Out: ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. पण पहिल्याच दिवशी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज ख्रिस वोक्स दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. यासह बीसीसीआयने देखील जसप्रीत बुमराहला रिलीज केलं आहे.
या सामन्यातील पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना ख्रिस वोक्सने इंग्लंडला दमदार सुरुवात करून दिली होती. त्याने केएल राहुलला स्वस्तात बाद करत भारतीय संघाला मोठा धक्का दिला. पण पहिल्या दिवसाच्या शेवटी क्षेत्ररक्षण करत असताना त्याला गंभीर दुखापत झाली.
नेमकं काय घडलं?
तर झाले असे की, इंग्लंडकडून ५७ वे षटक टाकण्यासाठी जेमी ओव्हरटन गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर करुण नायरने फटका मारला. चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने जात होता. त्यावेळी ख्रिस वोक्स चेंडू अडवण्यासाठी धावला. त्याने डाईव्ह मारून चेंडू अडवला. यादरम्यान त्याच्या खांद्याला जबरदस्त दुखापत झाली. त्यानंतर फिजिओ मैदानात आले आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले.
आता दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडने माहिती देत म्हटले की, ख्रिस वोक्सला दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं आहे. यासह आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही भारतीय संघातून रिलीज करण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराह या मालिकेतील ५ पैकी ३ सामने खेळणार हे आधीपासून ठरलं होतं. त्याचे ३ सामने खेळून झाले होते. त्यामुळे तो पाचवा कसोटी खेळणार की नाही हे स्पष्ट नव्हतं. शेवटी त्याला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.
भारताची पाचव्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज</p>
इंग्लंडची पाचव्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग