पीटीआय, चेन्नई : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. बुधवारी मध्यरात्री झालेल्या चार डावांमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या डिंग लिरेनने २.५-१.५ अशा आघाडीसह पहिल्या लढतीत विजयाची नोंद केली. 

१६ वर्षीय प्रज्ञानंदने पहिला डाव गमावल्यानंतर दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. त्याने हा डाव जिंकत लढतीत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर चीनच्या लिरेनने आपला अनुभव पणाला लावताना तिसऱ्या डावात बाजी मारत पुन्हा आघाडी मिळवली. चौथ्या डावात प्रज्ञानंद आणि लिरेन या दोघांनीही झुंजार खेळ केला. अखेर ३९ चालींअंती दोन्ही खेळाडूंनी हा डाव बरोबरीवर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लिरेनने चार डावांची पहिली लढत जिंकत अंतिम फेरीत महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. आता अंतिम फेरीच्या दुसऱ्या दिवशीही चार डाव खेळवले जातील. प्रज्ञानंदला ही चार डावांची दुसरी लढत जिंकण्यात यश आल्यास या स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकर खेळवण्यात येईल.