रवीचंद्रन अश्विन हा जगातल्या विचारी खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. खेळाचा, खेळाडूंचा अतिशय सखोल अभ्यास असणाऱ्या अश्विनला फसवण्याचा प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फिरकीपटू ॲडम झंपा असल्याचे भासवत एका अकाऊंटवरून अश्विनशी संपर्क करण्यात आला. या कथित झंपाने भारताच्या क्रिकेटपटूंचे फोन नंबर अश्विनकडे मागवले. अश्विनने या खोट्या झंपाबरोबर केलेलं चॅटिंग सोशल मीडियावर शेअर केलं आणि ते लगेचच व्हायरल झालं.
अश्विनने या खोट्या झंपाबरोबरचं बोलणं स्क्रीनशॉटच्या माध्यमातून शेअर केलं. कथित झंपा अश्विनला विचारतो की, ‘भावा मला या भारतीय खेळाडूंचे नंबर हवे आहेत’. झंपा त्यानंतर यादीच पाठवतो- अभिषेक शर्मा, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे.
अश्विनला यातला फोलपणा तात्काळ लक्षात आला. कथित झंपाची फिरकी घ्यायची म्हणून अश्विनने त्याला खोचक रिप्लाय दिला. ‘या खेळाडूंच्या नंबर्सची यादी लवकरच पाठवतो. एवढ्याच खेळाडूंचे नंबर्स पुरेसे आहेत की आणखी कोणाचे हवे आहेत’? कथित झंपाने रिप्लाय देत विचारलं, ‘हो भावा’.
अश्विनने त्याला विचारलं- ‘तुझ्याकडे महेंद्रसिंग धोनीचा नंबर आहे ना ? का तोही नंबर गेला तुझ्याकडून’?
हे संभाषण इतक्यावर थांबलं नाही. झंपाने खरा असल्याचं भासवत सांगितलं की माझ्याकडे धोनीचा नंबर आहे. त्यावर अश्विनने त्याला हुशारीने म्हटलं की, मला धोनीचा नंबर पाठवून दे. यावर कथित झंपाने अश्विनला सांगितलं की तुझ्याकडे जेवढ्या भारतीय क्रिकेटपटूंचे फोन नंबर आहेत ते सगळे पाठवून दे. अश्विनला आता खात्रीच पटली की हा झंपा तो नव्हे. त्याने रिप्लाय देताना सांगितलं की, सगळ्यांचे नंबर्स एकत्र करून एक्सेलशीटच पाठवतो.
अश्विनच्या फिरकीसमोर भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडते. झंपा असल्याचं भासवत अश्विनला फसवणारा स्वत:च अडकला. अश्विनच्या हुशारीचं आणि प्रसंगावधानाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर अशा फेक अकाऊंट्सपासून सावध राहण्याचं आवाहनही अनेकांनी केलं आहे.
३३ वर्षीय झंपा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकीपटू असून, ११४ वनडे आणि १०६ टी२० सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. भागीदारी तोडण्यात तो माहीर मानला जातो. धावा रोखणं आणि सातत्याने विकेट्स पटकावणं यात झंपाची हातोटी आहे. वनडे आणि टी२० प्रकारात झंपा ऑस्ट्रेलियाच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. आयपीएल स्पर्धेत झंपा आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांकडून खेळला आहे. अनेक भारतीय खेळाडू झंपाचे मित्र आहेत.