भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला करोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली. “माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला घरी वेगळे केले आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. यापूर्वी माझ्या संपर्कात आलेल्यांनी लवकरात लवकर चाचणी करावी. कृपया सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या”, असे हरभजनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
हरभजनने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याला भविष्यात पंजाबची सेवा करायची आहे. तेव्हापासून तो राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याने कोणत्याही पक्षात जाण्यास नकार दिला होता.




हरभजन सिंगला करोनाची लागण झाल्यामुळे मस्कतमध्ये एक दिवस आधी सुरू झालेल्या लेजेंड्स लीग क्रिकेटला मोठा धक्का बसू शकतो. स्पर्धेतील इंडिया महाराजास संघात त्याचा समावेश आहे. मात्र काल झालेल्या आशिया लायन्सविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता.
हरभजन सिंगने १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी १०३ कसोटीत ४१७ विकेट्स घेतल्या. त्याच्या नावावर २३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६९ विकेट आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याने २८ सामन्यात २५ विकेट घेतल्या आहेत. दोन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भज्जी सदस्य होता.