गुजरात टायटन्सला आयपीएलचं जेतेपद जिंकून देणारा हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. रविवारी खेळाडू संघात राखण्याची किंवा सोडण्याची प्रक्रिया पार पडली असून त्यात इतर अनेक खेळाडूंप्रमाणेच खुद्द गुजरात टायटन्सच्या कर्णधाराचाही करार बदलण्यात आला आहे. त्यानुसार आता हार्दिक पांड्या आपला पहिला संघ अर्थात मुंबई इंडिन्सकडे परतला आहे. रविवारी संध्याकाळी उशीरा यासंदर्भातली सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. अखेर आज मुंबई इंडियन्स व खुद्द आयपीएलनं आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावर यासंदर्भात माहिती दिली. त्यापाठोपाठ हार्दिक पांड्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई इंडियन्सनं केली अधिकृत घोषणा!
मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याचा एक फोटो आपल्या एक्स खात्यावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये हार्दिक पांड्यानं मुंबई इंडियन्सची जर्सी घातली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून बाहेर पडल्याचं अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं आहे. तसेच, हार्दिक पांड्याची पोस्टही मुंबई इंडिन्सनं पुन्हा शेअर करत “वेलकम होम”, असा संदेश लिहिला आहे.
आयपीएलची पोस्ट
दरम्यान, मुंबई इंडियन्सप्रमाणेच आयपीएलनंही आपल्या एक्स खात्यावर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे तर कॅमरून ग्रीन आरसीबीकडे गेल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता हार्दिक पांड्या पुढील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ब्लू जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
हार्दिक पांड्याची सोशल पोस्ट
एकीकडे मुंबई इंडियन्स व आयपीएलकडून सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करण्यात आली असताना दुसरीकडे हार्दिक पांड्यानंही मुंबई इंडियन्सकडे आल्यानंतर सोशल मीडिया पोस्ट केली आहे. हार्दिक पांड्यानं त्याच्या एक्स व इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात पहिल्या आयपीएल लिलावामध्ये त्याचा मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्यात आल्याचा प्रसंग दिसत आहे. ‘आय एम कमिंग होम’ हे गाणंही व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याचं आता स्पष्ट झालं असून त्याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्याचवेळी रोहित शर्माही संघात महत्त्वाच्या भूमिकेत असेल, असं बोललं जात आहे.
दुसरीकडे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये आल्यामुळे शुबमन गिलकडे गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.