Virat Kohli, Asia Cup 2023: आशिया कप सुपर-४ सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांना दिवसा तारे दाखवल्यानंतर विराट कोहलीने प्रेझेंटेशन दरम्यान मोठे वक्तव्य केले. या सामन्यात तो १३ हजार वन डे धावा सर्वात वेगवान करणारा फलंदाज बनला आहे. तसेच, त्याच्या ४७व्या शतकासह तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. आशिया चषकाच्या इतिहासात कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करण्याव्यतिरिक्त, त्याने आणि के.एल. राहुलने अनेक आश्चर्यकारक विक्रम आपल्या नावावर केले. प्रेझेंटेशन दरम्यान व्यासपीठावर पोहोचल्यावर संजय मांजरेकर यांनी त्याचे स्वागत केले. त्यावेळी तो म्हणाला की, “मी थकलो आहे.” असं का म्हणाला? जाणून घ्या.
पाकिस्तानविरुद्ध १२२ धावांच्या विक्रमी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले की, श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी तो मंगळवारी पूर्णपणे तयार आहे. त्याच्या मते, कसोटी क्रिकेट खेळल्याने त्याला बरीच मदत झाली. तो सलग तिसऱ्या दिवशी येऊन खेळू शकेल. याआधी पावसामुळे दोन दिवस चाललेल्या सामन्यात विराटने पाकिस्तानविरुद्ध ९४ चेंडूत १२२ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने पाकिस्तानला ३५७ धावांचे मोठे लक्ष्य दिले, प्रत्युत्तरात पाकिस्तान १२८ धावांत गुंडाळला आणि भारताने १२८ धावांनी विजय मिळवला.
सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला, “मी पाकिस्तानविरुद्ध धावा करण्यावर लक्ष केंद्रित करत होतो आणि या खेळीमुळे आनंदी होतो पण उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा चांगले खेळावे लागेल, असा विचार करत होतो.” तो पुढे म्हणाला, “१५ वर्षांच्या क्रिकेटमध्ये मी पहिल्यांदाच असं काही केलं आहे. सुदैवाने आम्ही कसोटीपटू आहोत, त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत कसे खेळायचे हे आम्हाला माहीत होते. सामन्यात आम्ही पुनरागमन केले हे महत्वाचे आहे. आज इथे खूप दमट हवामान होते. मी येत्या नोव्हेंबरमध्ये ३५ वर्षांचा होणार आहे, त्यामुळे मला माझ्या शरीराची काळजी घ्यावी लागेल. आता अधिक प्रश्न नकोत.” अशी हसत हसत त्याने संजय मांजरेकर यांना विनंती केली.
यावेळी समालोचक संजय मांजरेकर म्हणाले, “विराट फक्त एक प्रश्न विचारेन.” ते म्हणाला तुला लोकेश राहुलसोबत खेळताना कसे वाटले? यावर कोहली म्हणाला की, “के.एल. ने एवढ्या महिन्यांनी संघात पुनरागमन करून शानदार शतक झळकावले. त्याच्यामुळे माझ्यावरील दबाव कमी झाला. आज त्याच्यामुळे टीम इंडियाला ३५६ धावांचा मोठा स्कोर करता आला. राहुल जेव्हा पाच महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला तेव्हा ही खेळी त्याच्यासाठी खास होती, तो अय्यरच्या जागी प्लेइंग ११मध्ये सामील झाला होता,” असे म्हणत विराटने राहुलच्या खेळीचे कौतुक केले.
राहुलसोबतच्या भागीदारीबाबत कोहली पुढे म्हणाला, “के.एल. आणि मी दोघेही एवढे वर्ष क्रिकेट खेळत आहोत. जेव्हा तो खेळत होता त्यावेळी मी फक्त त्याला स्ट्राईक देण्याचे काम करतो. माझी फलंदाजी तुम्ही नेहमीच पाहता पण जेव्हा त्याच्यासोबत मी फलंदाजी करत होतो त्यावेळी मलाच खूप आनंद होत होता. जेव्हा अशा प्रकारची मोठी भागीदारी होते तेव्हा ती तोडणे कठीण असते. यामागील कारण म्हणजे, आम्ही फॅन्सी शॉट्स खेळले नाहीत. आम्ही भागीदारीचा फारसा विचार केला नाही. जास्त विचार न करता फक्त पुढे चेंडू पाहून खेळत राहण्याचा आमचा विचार होता. आमच्यासाठी आणि भारतीय क्रिकेटसाठीही ही सर्वात संस्मरणीय भागीदारी आहे. आता आम्ही उद्याच्या सामन्यावर अधिक लक्ष्य केंद्रित करत आहोत.”