आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान पदक नाकारल्यामुळे एका वर्षांच्या बंदीची शिक्षा ओढवून घेतलेली भारताची अव्वल बॉक्सर सरिता देवी आता आपली शैली सुधारण्यासाठी मेहनत घेत आहे. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याकरिता मी बंदीच्या काळात शैली सुधारण्यावर भर देत आहे, असे सरिताने सांगितले.
‘‘बंदीचा हा काळ मी सकारात्मकतेने घेणार असून सरावात कोणताही खंड पडणार नाही, याची काळजी घेणार आहे. खेळताना माझ्याकडून काही ठिकाणी चुका होतात, त्या टाळण्यासाठी मी मेहनत घेणार आहे. हे वर्ष माझ्यासाठी आव्हानात्मक असले तरी माझे कौशल्य आणि तांत्रिक शैली सुधारण्याकडे माझा भर असणार आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी सज्ज होण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून देणे, हेच माझे एकमेव ध्येय आहे,’’ असे सरिताने
सांगितले.
ती म्हणाली, ‘‘केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल हे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्यामुळे मला पुन्हा पुनरागमन करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. सोनोवाल यांचा पाठिंबा असल्यामुळे माझे मानसिक धैर्य उंचावले आहे.’’ आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने सरितावर लादलेली बंदी १ ऑक्टोबर २०१५ पर्यंत आहे. बंदीचा कालावधी संपल्यानंतर ती ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धामध्ये सहभागी होऊ शकेल.