आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या तीन सामन्यांमधील परस्परांविरुद्ध करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वर्तनाचे पडसाद आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) सर्वसाधारण बैठकीत मंगळवारी उमटले. ‘आयसीसी’ने खेळाडूंच्या या मैदानावरील आक्षेपार्ह कृतींबाबत भारतीय ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज साहिबजादा फरहान यांच्यावर शिस्तभंगाची, तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याला दोन सामन्यांतून निलंबित करण्याची कारवाई मंगळवारी केली.

‘आयसीसी’च्या एलिट सामना निरीक्षक समितीच्या सदस्यांसमोर भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान १४, २१ आणि २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यातील घटनांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर या कारवाईचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या १४ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात सूर्यकुमारला आचारसंहिता कलम २.२१ अनुसार खेळाची अप्रतिष्ठा केल्यासंदर्भात दोषी धरण्यात आले. त्याला सामन्याच्या मानधनातील तीस टक्के आर्थिक दंडासह एक दोषांक देण्यात आला.

पाकिस्तानच्या फरहानला याच कारणासाठी दोषी धरण्यात आले असून, त्याला अधिकृतपणे ताकीद देण्यात आली असून, एक दोषांकही देण्यात आला. याच दिवशी रौफलादेखील या कारणासाठी दोषी धरण्यात आले असून, त्याला तीस टक्के दंड आणि एक दोषांक देण्यात आला. भारताच्या अर्शदीप सिंगवर २१ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात आक्षेपार्ह वर्तन आणि अपमानास्पद हावभाव करण्यासाठी कलम २.६ नुसार आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, हे आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्याला निर्दोष ठरवण्यात आले.

स्पर्धेच्या २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात आक्षेपार्ह वर्तन केल्याची भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने कबुली दिल्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही. त्याला आचारसंहितेच्या २.२१ कलमाचा भंग केल्याप्रकरणी एक दोषांक देण्यात आला. याच सामन्यात रौफला याच कारणासाठी दोषी धरण्यात आले आणि त्याला तीस टक्के दंड आणि दोन अतिरिक्त दोषांक देण्यात आले. रौफचे चार दोषांक झाल्यामुळे त्याच्यावर आचारसंहितेच्या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले.