India vs Australia, WTC 2023 Final: अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी अनेक अंगावर येणाऱ्या चेंडूचा सामना केला. त्यांनी अनेक वेळा फिजिओला बोलावले. जेव्हा पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांचे चेंडू उसळी घेत होते तेव्हा ते अस्वस्थ दिसले. पण त्यांनी स्वत:ला खचू न देता मैदानावरच लढा देत राहिले. ते दोघे एका निर्धाराने तिथेच उभे राहून एखाद्या योध्यासारखे लढत होते. दोन तासांच्या कठोर परिश्रमानंतर आणि उत्कृष्ट प्रदर्शन करत त्यांनी सातव्या विकेटसाठी १०८ धावांची दमदार भागीदारी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २९६ धावा केल्या.

दिवसाच्या पहिल्याच षटकात के.एस. भरतची विकेट गामावल्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये फॉलोऑनची भीती पसरली होती. मात्र त्यानंतर शार्दुल आणि रहाणेने भारताचा गड राखला. हे काम अजिबात सोपे नव्हते तसेच त्यांना ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांकडून बऱ्याच चुका झाल्याने नशिबाची साथ देखील मिळाली.  शार्दुलचा झेल ग्रीनने सोडला, तर अजिंक्य रहाणेला पहिल्या स्लिपमध्ये जीवदान मिळाले. लंचपूर्वी शेवटच्या षटकात कमिन्सने शार्दुलला पायचीत केले परंतु तो त्याचा नो-बॉल ठरवण्यात आला.

मात्र ज्या प्रकारे या गोष्टीवर मात करत सर्वांना मागे टाकले आणि संयमाने फलंदाजी सुरू ठेवली ते कौतुकास्पद होते. खेळताना त्यांना अनेक वेळा चेंडूचा शरीरावर जबरदस्त फटका बसला मात्र तरीही त्यांनी नेटाने संघाची धावसंख्या पुढे नेली. त्याच षटकात कमिन्सने शार्दुलच्या उजव्या हाताला किमान तीन वेळा चेंडू  मारला, त्यामुळे त्याला दोन्ही हातांवर आर्म गार्ड घेणे भाग पडले. रहाणेच्याही बोटांवर दोन-दोन वेळा वार करण्यात आले.

हेही वाचा: WTC Final 2023: ड्रायव्हिंग सीटवर असूनही कांगारूंना वाटते टीम इंडियाची भीती; २० वर्षे जुन्या पराभवाची होतेय चर्चा…, जाणून घ्या

रहाणे आणि ठाकूर यांच्या शानदार भागीदारीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला की, “या जोडीने परदेशात खेळताना उद्भवलेल्या अशा परिस्थितीत संयम कसा बाळगावा आणि धैर्याने कसे बाहेर पडावे याचा संदेश भारतीय वरच्या फळीतील खेळाडूना दिला आहे. सौरव गांगुलीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांना सणसणीत चपराक मारली आहे.”

गांगुली स्टार स्पोर्ट्सवरील पहिल्या सत्रानंतरच्या कार्यक्रमात म्हणाला, “अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरने  इतर खेळाडूना दाखवून दिले की जर तुम्ही थोडा संयम बाळगलात तर तुम्हाला नाशिबाची देखील साथ मिळते. याचमुळे तुम्ही या विकेटवर धावा करू शकाल. भारताला समाधानकारक स्थितीत पोहोचवण्याचे सर्व श्रेय रहाणेला जाते, त्याने शानदार अर्धशतक केले. शार्दुलला मार लागला आणि दुखापत झाली म्हणून तो बाद झाला पण तरी त्याने रहाणेला दिलेली साथ मोलाची होती. त्याने यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये चांगली फलंदाजी केली आहे.”

हेही वाचा: WTC Final 2023: ट्रॅव्हिसच्या शतकावरून भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध, काय आहे हेडच्या बॅटचे पाक कनेक्शन? पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीसीसीआयचा माजी अध्यक्ष पुढे म्हणाला की, “या जोडीने भारतासाठी चांगली लढत दिली. वरच्या क्रमांकाच्या फलंदाजांसाठी हा संदेश आहे. अजिंक्य आणि शार्दुलची शानदार कामगिरी म्हणजे वरच्या फळीतील खेळाडूना आरसा दाखवणारी आहे. जर त्यांनी चांगली कामगिरी केली नाही तर त्यांना संघात स्थान राखणे कठीण असेल.” रोहित शर्मा आणि विराट कोहलीला अप्रत्यक्षरित्या टोला मारत येत्या काळात त्यांच्या बॅटमधून धावा निघणे किती महत्वाचे आहे हे सौरव गांगुलीने अधोरेखित केले आहे.