IND A vs AUS A Series : Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test : भारतीय संघाचा फॉर्म सध्या चांगला नाही. अलीकडेच न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा ३-० ने पराभव केला होता. या मालिकेनंतर भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय अ संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग दुसऱ्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारत अ संघाने ध्रुव जुरेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया अ संघाने ६ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. त्याचबरोबर दोन सामन्यांच्या मालिकेत भारताला व्हाईटवॉश केले.

भारताचा सलग दुसरा मालिकेत व्हाईटवॉश –

वास्तविक, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड म्हणजेच एमसीजी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा ६ गडी राखून पराभव केला. भारताचा पहिला डाव १६१ धावांवर आटोपला. या सामन्यात ध्रुव जुरेल वगळता एकही फलंदाजाला आपली छाप सोडता आली नाही. जुरेलने ८० धावांची खेळी खेळली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अ संघाने २२३ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघाने थोडी चांगली कामगिरी केली पण ती अपुरी ठरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळीही ध्रुव जुरेलने सर्वाधिक ६८ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात २२९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरुवातीला गडगडला पण नंतर सॅम कोन्स्टासच्या नाबाद ७३ आणि ब्यू वेबस्टरच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर सहा विकेट्स राखून लक्ष्य गाठले. अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया अ संघाने दोन अनधिकृत सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा २-० असा व्हाईटवॉश केला. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारताचा ७ विकेट्सने पराभव केला होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारत अ संघाच्या या पराभवामुळे टीम इंडिया धक्का बसला आहे.