Abhishek Sharma Run Out: आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील लढतीत भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने १६८ धावा केल्या. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ४१ धावांनी विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी मिळून या डावातही भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माने या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. त्याच्याकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण सूर्यकुमार यादवच्या एका चुकीमुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात फलंदाजी करत असताना अभिषेक शर्मा १२ व्या षटकात धावबाद होऊन माघारी परतला. त्यावेळी सूर्यकुमार यादव स्ट्राईकवर होता. तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान गोलंदाजी करत होता. सूर्याने कट शॉट मारला, जो वेगाने जात होता. त्यावेळी पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रिशाद हुसेनने एक नंबर क्षेत्ररक्षण करत हा वेगाने जात असलेला चेंडू अडवला. नॉन स्ट्राईकला फलंदाजी करत असलेला अभिषेक शर्मा अर्ध्या क्रिझपर्यंत आला होता. बांगलादेशच्या खेळाडूने चेंडू अडवला आहे, हे त्याला खूप उशिराने कळालं. त्यामुळे त्याला मागे जाता आलं नाही. सूर्या क्रिझमध्ये परतला. पण अभिषेक शर्मा क्रिझमध्ये पोहोचणार इतक्यात रिशादने वेगाने थ्रो केला आणि त्याला धावबाद केलं. यासह तो ७५ धावा करत माघारी परतला.
भारतीय संघाने केल्या १६८ धावा
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी मिळून ७७ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने ६ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ७५ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने २९ धावा केल्या. ही जोडी फुटल्यानंतर शिवम दुबे अवघ्या २ धावा करत माघारी परतला. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने ५ धावा केल्या. शेवटी हार्दिक पंड्याने ३८ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने १० धावा करत संघाची धावसंख्या ६ गडी बाद १६८ धावांवर पोहोचवली.
भारतीय संघाचा दमदार विजय
बांगलादेश संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या सैफ हसनने ६९ धावांची खेळी केली. सैफ हसनने शेवटपर्यंत किल्ला लढवला. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. परवेज हुसेनने २१ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर अक्षर पटेल आणि तिलक वर्माने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.