नॉटिंगहममध्ये पहिला दिवस भारतीयांनी गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपली शक्ती दाखवायला सुरूवात केली. उपाहारापर्यंत १ बाद ९७ अशी मजल मारलेल्या भारताची अवस्था ४ बाद १२५ अशी झाली आहे. अंधुक प्रकाश आणि पावसामुळे ४६.४ षटकानंतर खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर काही वेळाने पाऊस थांबला, पण खेळपट्टी ओली असल्याने खेळ  होऊ शकला नाही. पाऊस आणि अंधुक प्रकाशाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय पंचानी घेतला आहे. रोहित माघारी परतल्यानंतर संघाचे आधारस्तंभ विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे झटपट बाद झाले. विशेष म्हणजे विराट शून्यावर माघारी परतला.

इंग्लंडचा तेजतर्रार गोलंदाज जेम्स अँडरसनने आपली जादू कायम राखत विराटला पहिल्याच चेंडूवर बाद केले. अँडरसनने टाकलेला अप्रतिम चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. चेतेश्वर पुजारालाही अँडरसननेच बाद केले. त्याने ४ धावा केल्या. तर चोरटी धाव घेण्याच्या नादात अजिंक्य रहाणे ५ धावांवर तंबूत परतला. खेळ थांबला तेव्हा लोकेश राहुल ९ चौकारांसह ५७ तर ऋषभ पंत ७ धावांवर नाबाद होते.

 

कसोटीत विराटचे ‘गोल्डन डक’

  • वि. ऑस्ट्रेलिया, एमसीजी २०११-१२ (बेन हिल्फेनहॉस)
  • वि. इंग्लंड, लॉर्ड्स २०१४ (लियाम प्लंकेट)
  • वि. इंग्लंड, ओव्हल २०१८ (स्टुअर्ट ब्रॉड)
  • वि. वेस्ट इंडिज, किंग्स्टन २०१९ (केमार रोच)
  • वि. इंग्लंड, ट्रेंट ब्रिज (जेम्स अँडरसन)

विराट शून्यावर बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

 

 

 

 

हेही वाचा – “तुमचं दुसरं घरं तुमची आतुरतेनं वाट पाहतंय”; मुख्यमंत्र्यांची हॉकी संघाला भावनिक साद

इंग्लंडचा डाव

पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला थक्क केले. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या भारताच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ १८३ धावांत सर्वबाद झाला. जो रूटने ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने जेम्स अँडरसनची दांडी गुल करत इंग्लंडचा डाव संपवला. त्याने ४६ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद शमीला ३ आणि शार्दुल ठाकूरला २ बळी घेता आले.