क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीला अनेक वर्षे लोटली, पण तो आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या मुंबई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी याचे ताजे उदाहरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या एका चेंडूवर शुबमन गिलने चौकार ठोकला. शुबमनची साथ देण्यासाठी कप्तान विराट कोहलीही मैदानात होता.

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील ३७व्या षटकातील पहिल्या चेंडूवर गिलने जोरदार प्रहार केला. चेंडू जलद वेगाने सीमारेषेकडे गेला. काही वेळातच मैदानातील उपस्थित प्रेक्षकांनी ‘सचिन-सचिन…’च्या घोषणा दिल्या. मास्टर ब्लास्टरने २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.

हेही वाचा – सारा तेंडुलकर कोणासोबत गेली होती ‘डेट नाईट’वर? इन्स्टाग्रामवर झाला खुलासा; पाहा फोटो!

हेही वाचा – PHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी!

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आज रविवारी उपाहारापर्यंत भारताने दुसऱ्या डावात २ बाद १४२ धावा केल्या. अशा प्रकारे भारताची एकूण आघाडी आता ४०५ धावांची झाली आहे. पहिल्या डावात भारताच्या ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर आटोपला.

भारताने सकाळच्या सत्रात मयंक अग्रवाल (६२) आणि चेतेश्वर पुजारा (४७) यांच्या विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने दोन्ही विकेट घेतल्या. अशाप्रकारे या डावखुऱ्या फिरकीपटूने आतापर्यंत सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पहिल्या डावात ११९ धावांत सर्व १० बळी घेतले.