India vs Pakistan, Playing 11: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. भारतीय संघाने सुपर ४ फेरीत बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. तर पाकिस्तानने देखील बांगलादेशला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान पक्क केलं. हा सामना दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण दोन्ही संघ ४१ वर्षांत पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दरम्यान या महत्वाच्या सामन्यात कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या काय बदल होऊ शकतात.
दोन खेळाडू दुखापतग्रस्त
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली होती. या सामन्यात भारतीय संघातील २ मुख्य खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. गोलंदाजी करत असताना हार्दिक पांड्या पहिलं षटक टाकल्यानंतर मैदान सोडून गेला. तर अभिषेक शर्माने देखील क्षेत्ररक्षण करत असताना मैदान सोडलं होतं. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने दोघांच्या फिटनेसबाबत अपडेट दिली होती. त्याने अभिषेक शर्मा फिट असल्याचं सांगितलं. तर हार्दिकच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहोत असं सांगितलं होतं.
पाकिस्तानविरूद्ध भारताची प्लेइंग ११ बदलणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होणार हे निश्चित आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली गेली होती. हे दोघेही पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात पुनरागमन करताना दिसून येतील. दोघांनाही गेल्या सामन्यात विश्रांती करण्याची संधी मिळाली आहे.त्यामुळे या सामन्यात ते नव्या जोशात मैदानात उतरतील. त्यामुळे गेल्या सामन्यात सर्वात महागड्या ठरलेल्या हर्षित राणाला या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. यासह अर्शदीप सिंगला देखील प्लेइंग ११ मधून बाहेर केले जाऊ शकते.
पहिल्या सामन्यापासून भारतीय टीम मॅनेजमेंटने प्लेइंग ११ मध्ये खूप कमी बदल केले आहेत. आता पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यातही भारतीय संघ आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. खेळाडूंची दुखापत जर अडथळा निर्माण करत असेल, तर प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या सामन्यासाठी अशी अशू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
शुभमन गिल,अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.