IND vs SA: भेदक गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला. सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना एका प्रेक्षकाने मैदानाबाहेरील आणि मैदानातील सुद्धा सर्व सुरक्षा भेदत तो थेट रोहित शर्माजवळ गेला. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड मैदानवर या सामन्यात प्रेक्षक खूपच खुश होते कारण भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजांची पळताभुई थोडी केली होती.

टीम इंडिया पहिल्या टी२० मध्ये क्षेत्ररक्षण करत होती, त्याचवेळी एका चाहत्याने सुरक्षा कठडा तोडून मैदानात प्रवेश केला. इकडे तो चाहता थेट रोहित शर्माकडे गेला आणि त्याच्या पाया पडला. यानंतर चाहत्याने रोहित शर्मासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. हे जरी खरे असले तरी यावरून स्टेडियममधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधी सुद्धा असे खूप वेळा झाले आहे. महेद्रसिंग धोनी संदर्भात देखील असे घडले होते.

सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा स्वतः प्रेक्षकांजवळ गेला आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्याचबरोबर काही चाहत्यांनी त्याची सही (ऑटोग्राफ) घेतली. तर काहीना तो समोर आल्याने सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात नाणेपेक जिंकून रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं २० षटकात ८ गडी गमावून १०६ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंहनं सर्वाधिक तीन बळी घेतले. तर, दीपक चाहर आणि हर्षल पटेलने प्रत्येकी दोन- दोन गडी बाद केले. तर, अक्षर पटेलला एक बळी मिळाला. प्रत्युत्तरात भारतानं ८ गडी राखून दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलनं अर्धशतकी खेळी केली.