IND vs SA: सुर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे. याच खेळीने त्याचे टी२० आयसीसी क्रमवारीत प्रमोशन झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुष टी२० फलंदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. या नव्या क्रमवारीत पहिल्या चार क्रमांकात पुन्हा एकदा चुरस रंगलेली दिसतेय. भारतीय संघाचा प्रमुख टी२० फलंदाज बनलेला सूर्यकुमार यादव हा पुन्हा एकदा या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपले पहिले स्थान मात्र टिकवून ठेवलेय.
आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान हा पहिल्या स्थानी कायम आहे. त्याच्या नावे ८६१ गुण आहेत. त्यानंतर मागच्या आठवड्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम व तिसऱ्या क्रमांकावरील पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांना खाली खेचत भारताच्या सूर्यकुमार यादवने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एक अर्धशतक व ४६ धावांची खेळी केल्याचे फळ त्याला मिळाले. त्याच्या नावे ८०१ गुण आहेत. नव्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर बाबर तर चौथ्या क्रमांकावर मार्करम आहे.
रोहित शर्मा व विराट कोहली माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवने आल्या आल्या खणखणीत षटकार खेचले. त्याच्या या दोन षटकारांनी दोन मोठे विक्रम मोडले. त्यात पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान याचा विश्वविक्रमही आहे. सूर्यकुमार व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलले. आयसीसी क्रमवारीत रोहितने देखील या एका स्थानाची प्रगती करत १३ वे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील खेळीचा विराट कोहलीला खूप मोठा फायदा झाला. तो आता आयसीसी क्रमवारीत १५व्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया संघ पराभूत होऊन देखील त्यांचा कर्णधार ऍरॉन फिंच हा पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या जोडीला इंग्लंडचा डेव्हिड मलान, न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे, श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसंका, पाकिस्तानचा मोहम्मद वसीम व दक्षिण आफ्रिकेचा रिझा हेन्रिंक्स हे सुद्धा पहिल्या दहा मध्ये आहे.