भारतीय कसोटी संघ सलग दोन वेळा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. परंतु दोन्ही वेळा तगड्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात पराभवाचा सामना केला. यानंतर भारतीय संघात अनेक बदल केले जातील असं बोललं जात होतं. परतु संघात फारसे बदल झालेले नाहीत. नुकतीच बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये केवळ दोन ते तीन बदल पाहायला मिळाले आहेत.

कॅरेबियन भूमीवर खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. तर अलिकडच्या काळात आयपीएल आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद सोपवलं आहे. यासह भारतीय क्रिकेट निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संतुलित संघाची निवड केली आहे. या संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंना सधी देण्यात आली आहे. परंतु एका दिग्गज खेळाडूला बीसीसीआयने विश्रांती दिली आहे.

मधल्या फळीतला फलंदाज चेतेशवर पुजाराला बीसीसीआयच्या निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या १६ सदस्यीय संघात स्थान दिलेलं नाही. त्याच्याऐवजी बीसीसीआयने ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल या दोघांना संधी दिली आहे. यासह आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक इशान किशनलाही १६ सदस्यीय संघात संधी देण्यात आली आहे. किशनने अद्याप कसोटी पदार्पण केलेलं नाही. या दौऱ्यात त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये वर्णी लागू शकते. कारण एस. भरतने अद्याप यष्टीरक्षक फलंदाज म्हणून लक्षवेधी कामगिरी केलेली नाही.

यासह, बीसीसीआयने जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीलादेखील विश्रांती दिली आहे. त्याऐवजी मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी या तीन जलदगती गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> IND vs WI Test Team : वेस्ट इंडिज दौऱ्यावर BCCI कडून अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी, ऋतुराजसाठी गूड न्यूज!

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.