भारत आणि फिरकी खेळपट्टी, असे एक समीकरण आहे. पण या समीकरणाला छेद देते ती येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना या मैदानात रंगणार असून दोन्ही संघांना वेगाशी झुंज द्यावी लागणार आहे. या खेळपट्टीवर चेंडूला वेग आणि उसळी जास्त मिळते, त्याचबरोबर वातावरणानुसार चेंडू स्विंगही होतो. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांतील फलंदाजांची खरी परीक्षा पाहायला मिळेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांनी दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी एक विजय मिळवला असून या सामन्यातील विजयाने मालिकेत आघाडी घेण्याचे स्वप्न दोन्ही संघ पाहत असतील. कोची आणि नवी दिल्लीतील सामन्यांपेक्षा हा सामना दोन्ही संघांसाठी नवीन अनुभव देणारा नक्कीच असेल.
भारतीय संघाने जिंकलेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये अमित मिश्रा आणि रवींद्र जडेजा यांची भूमिका महत्त्वाची होती. पण या सामन्यामध्ये मात्र भारतीय संघ दोन फिरकीपटू खेळवण्याची शक्यता फार कमी आहे. एका फिरकीपटूला वगळून एका वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश करता येऊ शकतो. फलंदाजीमध्ये अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या सलामीवीरांना अजूनही छाप पाडता आलेली नाही. विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली असली तरी त्यांच्यामध्ये सातत्य दिसत नाही. अंबाती रायुडूलाही अजून सूर गवसलेला नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र दुसऱ्या सामन्यात चांगली फलंदाजी केल्याने त्याच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या असतील.
विंडीजचे वेगवान गोलंदाज चांगल्या फॉर्मात असून त्यांनी सुरुवातीलाच भारताला  धक्के दिले. रवी रामपॉल, जेरॉम टेलर, डॅरेन सॅमी आणि कर्णधार ड्वेन ब्राव्हो यांच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे.
फलंदाजीमध्ये मार्लन सॅम्युअल्स, दिनेश रामदिन आणि ड्वेन स्मिथ यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळालेली नाही. किरॉन पोलार्ड आणि डॅरेन ब्राव्हो यांच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी पाहायला मिळालेली नाही.
गेल्या दोन सामन्यांमध्ये नेमके काय करायचे, हे माझ्या डोक्यामध्ये ठरलेले होते. दिल्लीतील अर्धशतकी खेळीने मला लय सापडली आहे. दोन-तीन डावांमध्ये मी अपयशी ठरलो तर तुझ्याकडून मोठी खेळीची अपेक्षा आहे, असे लोक म्हणतात. पण गेल्या ४-५ वर्षांमध्ये मी सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे हे ते विसरतात.
– विराट कोहली

प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल.
वेस्ट इंडिज : ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), ड्वेन स्मिथ, डॅरेन ब्राव्हो, किरॉन पोलार्ड, मार्लन सॅम्युअल्स, दिनेश रामदिन (यष्टिरक्षक), आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, रवी रामपॉल, केमार रोच, जेरॉम टेलर, सुलेमान बेन, जेसन होल्डर आणि लिऑन जॉन्सन.
सामन्याची वेळ : दुपारी २.३० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.