पीटीआय, कानपूर
कर्णधार रोहित शर्मा आणि तारांकित फलंदाज विराट कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करत असलेल्या भारतीय संघाचे आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात बांगलादेशवरील वर्चस्व कायम राखण्याचे लक्ष्य असेल. भारताला कानपूर येथे होणारा हा सामना जिंकून दोन सामन्यांच्या या मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याची संधी आहे.

चेन्नई येथे झालेल्या पहिल्या लढतीत रविचंद्रन अश्विनचा अष्टपैलू खेळ, तसेच शुभमन गिल, यष्टिरक्षक ऋषभ पंतचे शतक आणि रवींद्र जडेजाच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर भारताने मोठा विजय नोंदवला. बांगलादेशने पहिल्या दिवशी यजमानांना दडपणाखाली आणले, पण भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत नव्या आंतरराष्ट्रीय हंगामाची विजयी सुरुवात केली. भारतीय संघ आता मायदेशात सलग १८वी कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

हेही वाचा >>>पाकिस्तानी संघाच्या हातात भारतीय राष्ट्रध्वज; व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण, कोणत्या स्पर्धेत घडली घटना?

जडेजाला अनोखी संधी

भारताचा अष्टपैलू जडेजाने कसोटी कारकीर्दीत आतापर्यंत ७३ सामन्यांत २९९ बळी मिळवतानाच फलंदाजीत ३१२२ धावाही केल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडे आता सर्वांत जलद ३००० धावा आणि ३०० बळींचा टप्पा गाठणाऱ्या अष्टपैलूंमध्ये दुसरे स्थान मिळवण्याची संधी आहे. इंग्लंडच्या इयन बॉथम यांनी ७२ कसोटी सामन्यांमध्ये अशी कामगिरी केली होती.

कोहली, रोहितला सूर गवसणार?

पहिल्या कसोटीत भारताने विजय साकारला असला तरी रोहित आणि कोहली या तारांकितांनी दोन्ही डावांत निराशा केली. त्यांना २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्यामुळे त्यांच्या कामगिरीत सुधारणेची भारताला अपेक्षा असेल. भारताचा कसोटी क्रिकेटचा आगामी व्यस्त कार्यक्रम पाहता या दोघांनी लवकरच लय मिळवणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>>SL vs NZ: ८ कसोटी, ८ अर्धशतकं; कामिंदू मेंडिसने रचला विश्वविक्रम, ही कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

शाकिबचा ट्वेन्टी२० क्रिकेटला अलविदा

● बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा गुरुवारी केली.

● बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) मायदेशात निवृत्तीचा कसोटी सामना खेळण्याची संधी न दिल्यास भारताविरुद्ध कानपूर येथे होणारा सामना हा आपला अखेरचा कसोटी सामना असेल, असेही त्याने स्पष्ट केले.

● शाकिबने बांगलादेशकडून १२० ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो जगभरातील विविध लीगमध्ये खेळणे सुरू ठेवणार आहे. तसेच पुढील वर्षी एकदिवसीय प्रारूपातील चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार असून यात आपण बांगलादेशसाठी अखेरचे खेळणार असल्याचे शाकिबने सांगितले.

● शाकिबनेे ७० कसोटी सामन्यांत ४६०० धावा करतानाच २४२ बळीही मिळवले आहेत. ‘बीसीबी’ने त्याला कसोटी संघातील स्थान कायम राहण्याचे आश्वासन न दिल्याने कानपूर कसोटी ही त्याची अखेरची असू शकेल.

नाहिदऐवजी तैजुलला संधीची शक्यता

पहिल्या कसोटीत बांगलादेशच्या गोलंदाजांनी प्रभाव पाडला, पण फलंदाजांना अपयश आलेे. पहिल्या डावात त्यांच्या फलंदाजांना भारतीय वेगवान आक्रमणासमोर काहीच करता आले नाही. मग दुसऱ्या डावात अश्विनच्या फिरकीने त्यांना अडचणीत आणले. अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनच्या सहभागाबाबत बरीच चर्चा होती. मात्र, शाकिब खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे प्रशिक्षक चंदिका हथुरासिंघे यांचे म्हणणे आहे. बांगलादेशचा संघ वेगवान गोलंदाज नाहिद राणाऐवजी डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लामला अंतिम अकरामध्ये स्थान देऊ शकेल.

पावसाचे सावट

गेले काही दिवस कानपूर येथील वातावरण काहीसे दमट आहे. त्यामुळे या कसोटीदरम्यान खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा कस लागू शकेल. यासह सामन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. कसोटीच्या पूर्वसंध्येलाही (गुरुवारी) पाऊस झाला. त्यामुळे मैदान आच्छादित करण्यात आले होते.

अक्षर की कुलदीप?

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पूरक मानली जाते. सुरुवातीच्या काही षटकांत वेगवान गोलंदाजांना मदत मिळणे अपेक्षित असले, तरी खेळ जसा पुढे जाईल, तसा खेळपट्टीत बदल पाहायला मिळू शकेल. त्यामुळे भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांऐवजी तीन फिरकीपटूंना अंतिम अकरामध्ये स्थान देऊ शकतो. अशा स्थितीत आकाश दीप किंवा मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादव किंवा अक्षर पटेलला संधी मिळू शकते. भारताने आपली फलंदाजी आणखी भक्कम करण्याचा निर्णय घेतल्यास डावखुऱ्या अक्षरला पसंती मिळेल. अन्यथा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला घरच्या मैदानावर खेळायला मिळू शकेल. ग्रीन पार्कवर यापूर्वी २०२१ मध्ये झालेल्या अखेरच्या कसोटीत भारताने अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर यांना संघात स्थान दिले होते. न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना अनिर्णित राहिला होता.

● भारत (संभाव्य ११) : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा.

● बांगलादेश (संभाव्य ११) : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), झाकिर हसन, शदमन इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकूर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टिरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, तस्किन अहमद.

● वेळ : सकाळी ९.३० वा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.