साऊदम्पटन : इंग्लंडविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष असेल. तसेच आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने या मालिकेत दर्जेदार कामगिरी करण्याचा सर्व खेळाडूंचा प्रयत्न असेल.

करोनाची बाधा झाल्याने रोहितला इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. मात्र, रविवारी रोहितच्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि त्याचा विलगीकरणाचा कालावधी संपला. त्यानंतर त्याने त्वरित सरावाला सुरुवात केली. त्यामुळे तो पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत खेळणे अपेक्षित आहे. कसोटी सामन्यात खेळलेल्या विराट कोहली, जसप्रित बुमरा, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या भारतीय खेळाडूंना पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत युवकांना आपले स्थान भक्कम करण्याची संधी मिळणार आहे.

दुसरीकडे, या सामन्यामार्फत इंग्लंडच्या नव्या अध्यायाला प्रारंभ होणार आहे. ईऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर जोस बटलरची इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघांच्या कर्णधारपदी निवड झाली. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडची ही पहिलीच मालिका असेल. इंग्लंडचे जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांसारखे प्रमुख कसोटीपटू या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी उपलब्ध नसतील. त्यामुळे इंग्लंडच्या संघात बऱ्याच अननुभवी खेळाडूंचा समावेश आहे.

हुडा, भुवनेश्वरकडून अपेक्षा

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात कर्णधार रोहित आणि इशान किशन भारताच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत दीपक हुडाला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळेल. हुडाने आर्यलडविरुद्ध आघाडीच्या फळीत खेळताना दोन सामन्यांत अनुक्रमे नाबाद ४७ आणि १०४ धावांची खेळी साकारली. त्यानंतर त्याने डर्बीशायरविरुद्धच्या सराव सामन्यातही अर्धशतक झळकावले. मधल्या फळीतील मुंबईकर सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा आणि दिनेश कार्तिक यांच्यात फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. भारताच्या गोलंदाजीची मदार प्रामुख्याने अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहल यांच्यावर असेल.

बटलर, लिव्हिंगस्टोनवर नजर

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार बटलरवर इंग्लंडच्या फलंदाजीची भिस्त आहे. बटलरने यंदा ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने नेदरलँड्सविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ७० चेंडूंत नाबाद १६२ धावा फटकावल्या होत्या. सलामीवीर जेसन रॉय आणि लियान लिव्हिंगस्टोनही मोठे फटके मारण्यात सक्षम आहेत. डावखुऱ्या डेव्हिड मलानची भूमिकाही महत्त्वाची असेल. गोलंदाजीत सॅम करन, डेव्हिड विली आणि ख्रिस जॉर्डन यांना प्रभावी मारा करावा लागेल. मोईन अलीचा अष्टपैलू योगदानाचा प्रयत्न असेल.

वेळ : रात्री १०.३० वा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३