गुजरात टायटन्सविरुद्ध आज सामना; आर्चर, ग्रीनकडून अपेक्षा

पीटीआय, अहमदाबाद

सलग तीन सामन्यांत विजय मिळवल्यानंतर गेल्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध पराभूत झालेला मुंबई इंडियन्सचा संघ मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. मुंबईने लीगमध्ये खराब सुरुवातीनंतर विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली होती. शनिवारी त्यांना पंजाबकडून १३ धावांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत ९६ धावा दिल्या. त्यामुळे पंजाबला ८ बाद २१४ धावसंख्या उभारता आली. गुजरातविरुद्ध मुंबईच्या गोलंदाजांना अखेरच्या षटकांतील कामगिरी सुधारावी लागेल.

वेगवान गोलंदाजांवर नजर

मुंबईकडे अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरेनडॉर्फ, कॅमरुन ग्रीन आणि जोफ्रा आर्चरसारखे गोलंदाज आहेत. या प्रत्येक गोलंदाजाने पंजाबविरुद्धच्या सामन्यात ४० हून अधिक धावा दिल्या. गुजरातविरुद्ध त्यांना ही कामगिरी सुधारावी लागेल. बुमराची कमतरता संघाला प्रखरतेने जाणवताना दिसत आहे. अनुभवी फिरकीपटू पीयूष चावला आणि त्याचा युवा साथीदार ऋतिक शौकीन यांनी चांगली गोलंदाजी केली. मुंबईची फलंदाजी मजबूत दिसत आहे. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. तसेच, सूर्यकुमार यादवच्या गेल्या काही सामन्यांतील खेळी पाहता त्याने लयीत येण्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत. याशिवाय अष्टपैलू ग्रीन व टिम डेव्हिड यांनी फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

शमी, रशीदवर गुजरातची मदार

गुजरातने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करताना सामना जिंकला. गुजरातच्या विजयात अनुभवी मोहित शर्माने निर्णायक भूमिका पार पाडली. लखनऊने १३६ धावांचा पाठलाग करताना १४ षटकांत १ बाद १०५ अशी मजल मारली होती. मोहितने अखेरच्या षटकांत १२ धावांचा बचाव करताना संघाला विजय मिळवून दिला. मोहम्मद शमीनेही बळी मिळवले. रशीद खानच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या फिरकीपटूंनी आपली छाप पाडली आहे. फलंदाजीत वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल सलामीला चांगले योगदान देत आहेत.

वेळ : सायं. ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा