IPL 2019 : ख्रिस गेलकडून गोलंदाजांची धुलाई, रैनाच्या विक्रमाशी बरोबरी

एका धावाने हुकलं गेलचं शतक

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 173 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ख्रिस गेलच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने हा पल्ला गाठला. ख्रिस गेलने 64 चेंडूत 99 धावांची खेळी केली. केवळ एका धावाने त्याचं शतक हुकलं. मात्र या खेळीदरम्यान त्याने दोन अनोख्या विक्रमांशी बरोबरी केली आहे.

आयपीएलमध्ये 99 धावांवर नाबाद राहिलेला गेल दुसरा फलंदाज ठरला आहे. गेलने या यादीत सुरेश रैनाशी बरोबरी केली आहे. 2013 साली सुरेश रैना हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 99 धावांवर नाबाद राहिला होता.

दरम्यान एका धावाने शतक हुकल्यामुळे ख्रिस गेलची ही खेळी टी-20 क्रिकेटमधली शंभरावी अर्धशतकी खेळी ठरली. टी-20 क्रिकेटमध्ये 100 वेळा 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी करणारा गेल पहिला फलंदाज ठरला आहे. गेलने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिनने कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

दरम्यान, लोकेश राहुल आणि ख्रिस गेल जोडीने पंजाबच्या डावाची अतिशय आक्रमक सुरुवात करुन दिली होती. मात्र लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत आपल्या विकेट फेकल्या. यामुळे मधल्या षटकांमध्ये पंजाबची धावगती मंदावली. मात्र ख्रिस गेलने अखेरच्या षटकांमध्ये आपला दाणपट्टा चालवत संघाला 173 धावांचा पल्ला गाठून दिला. बंगळुरुला आपला पहिला विजय मिळवण्यासाठी 174 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. ख्रिस गेलने 64 चेंडूत 99 धावांची खेळी केली

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करम्याचा निर्णय घेतलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी पहिल्या षटकापासून बंगळुरुवर हल्ला चढवला. विशेषकरुन ख्रिस गेलने सर्वा गोलंदाजांची धुलाई केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत गेलने झटपट धावा जमवल्या. मात्र लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल, सरफराज खान आणि सॅम करन झटपट बाद झाले. यावेळी गेलने स्वतःवर संयम ठेवत एक बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजूने मनदीप सिंहने त्याला चांगली साथ दिली. अखेरच्या षटकांत केलेल्या याच फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2019 chris gayle joins suresh raina in unique list