पंजाबने बंगळुरुवर ३४ धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवले आहे. पंजाबच्या हरप्रीतने चांगली गोलंदाजी करत बंगळुरुचे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. विराट आणि मॅक्सवेल पाठोपाठ बाद झाले. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सलाही तंबूचा रस्ता दाखवला.

बंगळुरुचा डाव

बंगळुरुला देवदत्त पडिक्कलच्या रुपानं पहिला धक्का बसला आहे. रिले मेरेदिथच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ६ चेंडूत ७ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली ३५ धावा करून तंबूत परतला. हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. तर दुसऱ्या चेंडूवरच ग्लेन मॅक्सवेल त्रिफळाचीत झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतरच्या षटकात एबी डिव्हिलियर्सलाही त्याने तंबूचा रस्ता दाखवला. विजयी अंतर कमी करण्यासाठी रजत पाटिदारने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्नही अपयशी ठरला. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्यानंतर शाहबाज अहमदही बाद झाला. लगेचच दुसऱ्या चेंडुवर रवि बिश्नोईने सॅमचा त्रिफळा उडवत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. हर्षल पटेलनं १३ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. मात्र विजयी अंतर खूप असल्याने त्याचा फायदा झाला नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रवि बिश्नोईने त्याचा अप्रतिम झेल घेतला.

पंजाबचा डाव
पंजाबचे पाच गडी बाद झाल्याने संघाची धावसंख्या मंदावली होती. मात्र केएल राहुल आणि हरप्रीत ब्रार यांनी सहाव्या गड्यासाठी चांगली भागिदारी केली. त्यामुळे पंजाबला १७९ धावा करता आल्या. कर्णधार केएल राहुलला बंगळुरुच्या विरुद्धच्या सामन्यात लय सापडली . मात्र दुसऱ्या फलंदाजांची त्याला साथ मिळताना दिसली नाही. त्याने ५७ चेंडूत ९१ धावा केल्या. यात ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागिदारी केली. आक्रमक खेळी करणारा ख्रिस गेल ४६ धावा करुन बाद झाला. या खेळीत ख्रिस गेलनं कायल जेमिसनच्या गोलंदाजीवर ५ चौकार ठोकले. कायलच्या षटकात २० धावा आल्या. त्याच्या आक्रमक खेळीमुळे बंगळुरुच्या गोलंदाजांवर दडपण आलं होतं. मात्र डॅनियल सॅमच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्सने यष्टीमागे त्याचा झेल घेतला. ख्रिस गेल बाद झाल्याने बंगळुरुच्या गोलंदाजांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले शाहरुख खान आणि दीपक हुड्डाही मैदानावर तग धरु शकले नाहीत. निकोलस पूरन आणि प्रभसिमरन सिंगही स्वस्तात बाद झाले.

या सामन्यात पर्पल कॅपचा मानकरी असलेला हर्षल पटेल महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात ५३ धावा दिल्या. त्याला एकही गडी बाद करता आला नाही.

बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पराभव झाल्याने हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. पंजाबने या संघात तीन बदल केले होते. रिले मेरेदिथ, प्रभसिमरन सिंग आणि हरप्रीत ब्रार यांना संघात स्थान दिलं. तर मोजेस हेन्रिक, अर्शदीप सिंग आणि मयंक अग्रवाल यांना आराम देण्यात आला होता. मयंकची प्रकृती ठिक नसल्याचं कारण देण्यात आलं. तर बंगळुरुमध्ये एक बदल करण्यात आला होता. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदला संधी देण्यात आली होती.

दोन्ही संघातील खेळाडू

पंजाब- केएल राहुल (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, ख्रिस गेल, दीपक हुड्डा, निकोलस पूरन,शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ख्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, रिले मेरेदिथ

बंगळुरु– विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, डॅनियल सॅम्स, कायल जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल