पर्पल कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेल्या हर्षल पटेलने (४/१७) मिळवलेली हॅट्ट्रिक आणि ग्लेन मॅक्सवेल (५६ धावा), कर्णधार विराट कोहली (५१) यांनी केलेल्या उत्तम फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रविवारी मुंबई इंडियन्सला ५४ धावांनी धूळ चारली. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सची गुणतालिकेमध्ये सातव्या स्थानावर घसरण झालीय. मागच्या रविवारी सुरु झालेल्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वामध्ये मुंबईच्या संघाची पराभवाची मालिका सुरुच आहे. सलग तीन पराभव झाल्याने मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये जाईल की नाही हे सुद्धा आता सांगणं कठीण झालं आहे. मुंबईचे या स्पर्धेमधील प्लेऑफ सुरु होण्यापूर्वीचे केवळ चार सामने शिल्लक आहेत. त्यामुळेच आता मुंबईसाठी प्ले ऑफचा मार्ग आणखीन खडतर झालाय. तर रविवारी कोलकात्यावर मिळावलेल्या विजयामुळे धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफमधील स्थान जवळजवळ निश्चित झालंय. एकीकडे मुंबईच्या चाहत्यांची सलग तिसरा पराभव झाल्याने चिंता वाढली असली तरी दुसरीकडे सीएसकेबरोबरच दिल्ली आणि बंगळूरुच्या संघांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे तिन्ही संघ प्लेऑफमध्ये खेळणार हे जवळजवळ निश्चित झालंय. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी काय करावं लागणार आहे ते पाहूयात…

नक्की वाचा >> ‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं कर्णधारपद? BCCI कडे विराटच्या Attitude बद्दल केलेली तक्रार

सर्वात सोपा मार्ग…
अगदी आदर्श स्थितीमध्ये मुंबईला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे. प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल आणि इतर संघांवर निर्भर रहायचं नसेल तर रोहितच्या संघासमोर ४ पैकी ४ विजय हा सर्वात सोपा मार्ग आहे. शेवटचे चारही सामने जिंकले तर त्यांचे एकूण गुण १६ होतील. म्हणजेच त्यांना या साखळी फेरीतील सामने संपताना चौथं स्थान मिळवता येईल. मुंबईचा संघ दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि हैदराबादविरोधात आपले उर्वरित सामने खेळणार आहे. हे चारही संघ सुद्धा फरसे फॉर्मात नसल्याने मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे.

नक्की वाचा >> IPL 2021: “मी असतो तर कर्णधारपद सोडलं असतं”; ‘त्या’ कृतीमुळे संतापला गौतम गंभीर

चार विजय मिळवता आले नाही तर?
आपल्या उरलेल्या चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतरही मुंबई प्लेऑफमध्ये खेळण्याची शक्यता आहे. मात्र असं झाल्यास मुंबईला १४ गुणांसहीत इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे. सध्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे संघ मुंबईच्या पुढे आहे. प्लेऑफसाठी सध्या ज्या पाच संघांमध्ये चुरस आहे त्यामध्ये सर्वात वाईट नेट रनरेट मुंबईचा आहे. म्हणजेच २०१४ च्या सिझनप्रमाणे ज्यापद्धतीने मुंबईला रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर षटकार हवा होता तशी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळेच सरळ चार सामने जिंकणे हा अधिक सुटसुटीत पर्याय मुंबईला कधीही हवाहवासा वाटणार आहे यात शंका नाही.

नक्की वाचा >> IPL 2021: “मी असतो तर कर्णधारपद सोडलं असतं”; ‘त्या’ कृतीमुळे संतापला गौतम गंभीर

...तर मुंबई बाहेर
१४ पेक्षा कमी गुण असतील तर मुंबई यंदा प्लेऑफच्या बाहेर आहे हे निश्चित मानलं जात आहे. या परिस्थितीमध्ये २०१८ नंतर पहिल्यांदाच मुंबई प्लेऑफमधून बाहेर पडेल. यापूर्वीही मुंबईने अनेकदा करो या मरोच्या स्थितीमध्ये आपल्या कौशल्याच्या जोरावर सामने जिंकून प्लेऑफमध्ये धडक मारल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळेच मुंबई पुन्हा एकदा तो चमत्कार करेल अशी आशा संघाच्या चाहत्यांना आहे.

चेन्नई आणि दिल्ली जवळजवळ फिक्स…
२०२० च्या पर्वात वाईट कामगिरी करणारा चेन्नईचा संघ यंदा मात्र प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरण्याची शक्यता आहे. चेन्नईचा प्लेऑफमधील प्रवेश जवळजवळ निश्चित झाला असून ८ विजय मिळवून १६ गुणांसहीत चेन्नई अव्वल स्थानी आहे. आता चेन्नई उर्वरित सर्व सामन्यांमध्ये पराभूत झाला तरी चौथ्या स्थानावर राहणार संघ ठरणार आहे. त्यामुळे त्याचं प्लेऑफचं तिकीट निश्चित झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघानेही प्ले ऑफचं तिकीट बूक केल्यात जमा आहे. १० पैकी ८ सामने जिंकलेल्या दिल्लीने १६ गुणांसहीत सध्या दुसऱ्या स्थानी मजल मारलीय. दिल्लीचा प्रवेश निश्चित समजला जातोय. याचबरोबर विराट कोहलीच्या संघाने उरलेल्या चारपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी त्यांना प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळणार असं मानलं जात आहे.