अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला आपल्या संघात परत घेण्यात मुंबई इंडियन्सला यश मिळालं आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामाकरिता प्रत्येक संघाने आपल्याकडे कायम ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) आणि करारमुक्त केलेल्या (रिलीज केलेल्या) खेळाडूंच्या याद्या रविवारी जाहीर केल्या. त्यानंतर आता खेळाडू ट्रेड करण्याची (खेळाडूंची अदलाबदली) विंडो १२ डिसेंबरपर्यंत खुली असणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने या ट्रेडिंग विंडोचा वापर करून आपला जुना खेळाडू हार्दिक पांड्याला आपल्याकडे परत घेतलं आहे.

हार्दिक मुंबईकडे परतण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याबद्दल मुंबई इंडियन्स आणि आयपीएलने अधिकृत घोषणा केली आहे. दरम्यान, हार्दिक पांड्यानंतर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचं उत्तरदेखील समोर आलं आहे.

येत्या १९ डिसेंबर रोजी दुबईत आयपीएलमधील खेळाडूंची लिलावप्रक्रिया पार पडणार आहे. त्यापूर्वी १२ डिसेंबरपर्यंत खेळाडूंची अदलाबदली करण्याची मुभा आहे. हार्दिक पांड्या मुंबई संघात परतण्याची प्रक्रिया झाली असून तो आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. आयपीएलने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. दरम्यान, हार्दिकनंतर गुजरात टायटन्सच्या संघव्यवस्थापनाने शुबमन गिलकडे संघाची कमान सोपवली आहे.

हे ही वाचा >> Video: मुंबई इंडियन्सकडे आल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली पोस्ट; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

गुजरात टायटन्स हा संघ २०२२ मध्ये आयपीएलमध्ये सहभागी झाला. पदार्पणाच्या स्पर्धेत कर्णधार हार्दिक पांड्याने या संघाला आयपीएलचं जेतेपद पटकावून दिलं होतं. तर यंदादेखील हा संघ फायनलमध्ये दाखल झाला होता. परंतु, अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातवर मात केली. सलग दोन वेळा आयपीएल फायनल गाठल्यामुळे एक बलाढ्य संघ म्हणून गुजरात टायटन्सचं नाव घेतलं जातंय. त्यामुळे हार्दिकनंतर या बलाढ्य संघाची धुरा शुबमन गिल कशी सांभाळतो याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष असेल.