Mumbai Indians players trolled Naveen Ul Haq: आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात लखनऊचा खेळाडू नवीन-उल-हकने शानदार गोलंदाजी केली. फलंदाजी करताना संपूर्ण संघ फ्लॉप झाला असला तरी. यासह या संघाचे विजेतेपदाचे स्वप्नही अपूर्ण राहिले. आपल्या चमकदार कामगिरीनंतरही, विराट कोहलीशी भांडण करणारा नवीन-उल-हक त्याच्या गोड आंब्याच्या टिप्पणीमुळे ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर आंब्याचा फोटो शेअर करून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवीनला डिवचले.

लखनऊकडून नवीन-उल-हकने सामन्यात सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मात्र, त्याने चार षटकांत ३८ धावाही दिल्या. नवीनने कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन या महत्वाच्या खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या. केवळ त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात २०० च्या पुढे धावा काढता आल्या नाहीत.

नवीन उल हकने आरसीबीला डिवचले होते –

या आयपीएल सीझनमध्ये तुम्ही सर्वांनी गोड आंबा हा शब्द ऐकला असेलच, हो विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर या शब्दाची सतत चर्चा होत आहे. आरसीबीला गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, तेव्हा नवीन उल हक त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आरसीबीच्या पराभवाचा आनंद घेताना आंब्याचे फोटो शेअर केले होते. त्याने आरसीबीला एक प्रकारे पराभवानंतर डिवचण्याचे काम केले होते.

मुंबईच्या खेळाडूंनी नवीन उल हकची उडवली खिल्ली –

लखनऊ सुपर जायंट्ससाठी ही सलग दुसरी वेळ आहे, जेव्हा हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचूनही ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला आहे. अशा परिस्थितीत नवीन-उल-हकची खिल्ली उडवण्याचे काम यावेळी मुंबईच्या तीन खेळाडूंनी केले, ज्यामध्ये संदीप वारियर, विष्णू विनोद आणि कुमार कार्तिकेय यांचा समावेश आहे. त्यांनी गांधीजींच्या तीन माकडांच्या स्टाईलमध्ये आंब्याच्या फोटोसह पोज दिली आहे. एक प्रकारे ते नवीन उल हकला सांगत आहेत की, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका आणि वाईट ऐकू नका. हा फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हेही वाचा – LSG vs MI: कोण आहे आकाश मधवाल? ज्याने लखनऊविरुद्ध रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत मुंबईला विजय मिळवून दिला, घ्या जाणून

नवीन उल हकने रोहित शर्माला बाद केल्यानंतर कान बंद करून आनंद साजरा केला होता. त्यानंत मुंबईच्या विजयानंतर अगदी तशाच प्रकारे, मुंबई इंडियन्सचे खेळाडू टेबलावर गोड आंबे ठेवून कान बंद करत आहेत, त्यानंतर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.