आयपीएल २०२५ चॅम्पियन ठरलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ बंगळुरूमध्ये दाखल झाला आहे. आरसीबीने १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जेतेपदाला गवसणी घातली. यानंतर आरसीबीचा संघ या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान बंगळुरूमध्ये आरसीबीच्या संघाची आणि खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी अलोट गर्दी केली आहे. याचा अनुष्का शर्माने व्हीडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.
मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून २०२५ च्या इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या, या खेळीमुळे त्याच्या संघाने ९ विकेटच्या मोबदल्यात १९० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने ७ विकेट्स गमावत फक्त १८४ धावा केल्या आणि आरसीबीने सामना जिंकत १८ वर्षांची दीर्घ प्रतीक्षा संपवली.
विराट कोहली आणि आऱसीबीचा संपूर्ण संघ बंगळुरूमध्ये दाखल झाला आहे. एअरपोर्टवर कर्नाटकचे उप-मुख्यमंत्री स्वागतासाठी उपस्थित होते. त्यांनी सर्व खेळाडूंचे स्वागत केले. त्यानंतर संघाची बस एअऱपोर्टवरून विधान सौधाकडे जात असताना चाहत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी एक झलक पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती. यादरम्यान अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्रावर व्हीडिओ पोस्ट केले आहेत.
अनुष्काने टीमबसमध्ये विराट कोहली ट्रॉफी घेऊन पुढे बसलेला व्हीडिओ पोस्ट केला आहे आणि त्यानंतर टीमबसच्या पसरलेला अलोट चाहतावर्ग तिथे दाखवला. यानंतर अनुष्काने अजून एक पोस्ट शेअर करत टीम बस चाहत्यांच्या बाजूने जात असलेला व्हीडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये चाहते आरसीबीची जर्सी तसेच त्यांच्या मुलांसह देखील उपस्थित होते. याचबरोबर चाहतेही टीमबसचा व्हीडिओ काढत जल्लोष करताना दिसले.
अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हे दोन्ही व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. याचबरोबर आरसीबीचा संपूर्ण संघ विधान सौधा येथे पोहोचला आहे. जिथे संपूर्ण संघाचा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दारमया यांनी सत्कार केला. ज्याचे फोटो, व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहेत. तर चिन्नास्वामी स्टेडियमवर संपूर्ण संघ आयपीएल ट्रॉफीसह चाहत्यांबरोबर जल्लोष करण्यसाठी पोहोचणार आहे.