संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल २०२५ स्पर्धेत संघर्ष करत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी या संघाने १० पैकी केवळ ३ सामने जिंकले होते. आजचा सामना हा जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे या सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही.
राजस्थान रॉयल्स संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज संदीप शर्माला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागने नाणेफेकीच्या वेळी याबाबत माहिती दिली. तो म्हणाला की, “ संदीपच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो हा सामना खेळू शकणार नाही. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागू शकतो.” त्याची दुखापत गंभीर असल्याचं रियान परागने सांगितलं. त्यामुळे तो या स्पर्धेतील उर्वरित सामने खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. संदीप शर्माने राजस्थान रॉयल्ससाठी चांगली गोलंदाजी केली आहे.
संदीप शर्माच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ९ गडी बाद केले आहेत. त्याने राजस्थानसाठी गोलंदाजी करताना सुरुवातीच्या षटकांमध्ये आणि शेवटच्या षटकातही चांगली गोलंदाजी गेली आहे. एकीकडे संदीप शर्माने चांगली गोलंदाजी केली आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या संघाला १० पैकी ७ सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ं :
मुंबई इंडियन्स: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, फजलहक फरूकी.