Chris Gayle Celebration with Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७ वर्षांचा आयपीएल चषकाचा दुष्काळ संपवला आहे. आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर सहा धावांनी मात करत बंगळुरूने आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. बंगळुरूने पंजाबसमोर १९१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं जे गाठण्यात पंजाबच्या फलंदाजांना यश आलं नाही. १८ व्या प्रयत्नात बंगळुरूने आयपीएल चषक उंचावला असून इतकी वर्षे या संघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या विराट कोहलीला त्याचे अश्रू आवरता आले नाहीत.

शेवटच्या षटकात सामना बंगळुरू जिंकणार हे निश्चित झाल्यानंतर विराट अक्षरशः रडू लागला होता. सामना जिंकल्यानंतर त्याचे संघातील सहकारी, मित्र त्याच्या दिशेने धावले आणि सगळ्यांनी त्याला मिठी मारून विजयोत्सव साजरा केला. यावेळी समालोचन करत असलेला विराटचा मित्र, आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सनेही विराटला घट्ट मिठी मारली. त्यानंतर आणखी एका खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधलं, तो म्हणजे ख्रिस गेल.

ख्रिस गेलच्या अवताराने वेधलं लक्ष

सामना जिंकल्यानंतर ख्रिस गेल देखील विराटला भेटला. त्याने विराटला मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. गेल यावेळी एका वेगळ्या अवतारात दिसला. त्याने आरसीबीची जर्सी परिधान केली होती. तसेच त्याने शीख समुदायाची पवित्र पगडी देखील परिधान केली होती. त्याचा हा अवतार पाहून अनेकजण अचंबित झाले होते. मात्र गेलच्या या अवतारामागे खास कारण आहे. गेल अनेक वर्षे बंगळुरू संघाकडून खेळला आहे. त्यामुळे त्याने आरसीबीची जर्सी परिधान केली होती. मात्र, त्याने आयपीएल कारकिर्दीच्या उत्तरार्धात पंजाब किंग्सचं देखील प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे तो त्याच्या दोन्ही संघाच्या चाहत्यांसाठी अशा अवतारात मैदानात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंगळुरूची पंजाबवर सहा धावांनी मात

या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निर्धारित २० षटकांत बंगळुरूने ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात पंजाबच्या काईल जेमिसन व अर्शदीप सिंगने प्रत्येक ३ बळी घेत RCB चं कंबरडं मोडलं. तर बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा जमवल्या. पाठोपाठ १९१ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची गाड १८४ धावांवर रोखण्यात बंगळुरूच्या गोलंदाजांना यश मिळालं.