Chennai Super Kings vs Gujarat Titans Live, IPL 2023 Final Updates: आयपीएल २०२३च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह चेन्नईने सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली. दोन्ही संघांनी पाच वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना चेन्नईचा संघ केवळ चार चेंडू खेळला. यानंतर मुसळधार पाऊस आला आणि सामना सुरू झाला तेव्हा चेन्नईसमोर १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य होते. चेन्नई संघाने शेवटच्या चेंडूवर पाच गडी गमावून लक्ष्य गाठले आणि पाचवा करंडक जिंकला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात चांगली झाली. ऋद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. शुबमनला सातव्या षटकात महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टिचित केले. त्याला २० चेंडूत ३९ धावा करता आल्या. यामध्ये सात चौकारांचा समावेश आहे. यानंतर ऋद्धिमान साहा आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. दरम्यान, साहाने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला दीपक चाहरने धोनीच्या हाती झेलबाद केले. साहा ३९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५४ धावा करून बाद झाला.
यानंतर सुदर्शन आणि कर्णधार हार्दिकने तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. सुदर्शनने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत ४७ चेंडूत ९६ धावा केल्या. आयपीएल २०२३ मधील हे त्याचे तिसरे अर्धशतक होते. सुदर्शनचे शतक हुकले. २०व्या षटकात मथिशा पाथिरानाने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर राशिदला पाथिरानाने ऋतुराज गायकवाडला झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. हार्दिकने १२ चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या. चेन्नईकडून पाथिरानाने २ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी दीपक चाहर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तुषार देशपांडे चांगलाच महागात पडला. त्याने चार षटकात ५६ धावा लुटल्या.
गुजरात टायटन्सने शानदार फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. आयपीएल फायनलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या होत्या. चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्यासाठी विक्रमी धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. यापूर्वी आयपीएल फायनलमध्ये २०० धावांचा पाठलाग फक्त एकदाच झाला होता. २०१४ साली कोलकाताने फायनलमध्ये पंजाबसमोर २०० धावांचे आव्हान ठेवले होते. यापेक्षा जास्त धावांचा पाठलाग कधीच केला गेला नाही. गुजरातकडून साई सुदर्शनने तुफानी खेळी केली. त्याचे शतक जरी हुकले असले तरी त्याच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने चेन्नईला अंतिम सामन्यात अडचणीत आणले आहे. त्याने ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९६ धावा चोपल्या.
Chennai Super Kings vs Gujarat Titans IPL Final Highlights Score Updates: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल २०२३ फायनल हायलाइट्स मॅच अपडेट्स
चेन्नईला १२ चेंडूत २१ धावांची गरज असताना अंबाती रायडू आणि कर्णधार एम. एस. धोनी बाद झाले. त्यामुळे गुजरात टायटन्सने सामन्यात पुन्हा एकदा रंजक आणली. मोहित शर्माने त्याच्या एकाच षटकात दोघांना बाद केले. माहीला भोपळाही फोडता आला नाही. रायडूने ८ चेंडूत १८ धावा करत सामना जवळ आणून दिला होता.
चेन्नई सुपर किंग्स १५९-५
१० षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जने दोन गडी गमावून ११२ धावा केल्या होत्या. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात अजिंक्य रहाणे १३ चेंडूत २७ धावा करून मोहित शर्माच्या गोलंदाजीवर विजय शंकरकरवी झेलबाद झाला.
चेन्नई सुपर किंग्स ११७-३
सहा षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जने एकही विकेट न गमावता ७२ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऋतुराज १६ चेंडूत २६ धावा आणि डेव्हॉन कॉनवे २५ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. अफगाणी फिरकीपटूंनी चेन्नईला एकापाठोपाठ दोन धक्के दिले.
चेन्नई सुपर किंग्स ७८-२
पावसानंतर सामना पुन्हा सुरू झाला, १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. कॉनवे आणि गायकवाड मैदानात परतले असून त्यांनी चेन्नईसाठी दमदार सुरुवात केली आहे.
चेन्नई सुपर किंग्स ४८-०
राखीव दिवशीही फायनलमध्ये पावसाने कहर केला. चेन्नईच्या डावाच्या ०.३ षटकांनंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. आता त्यात एक नवीन अपडेट आले आहे. हा सामना दुपारी १२.१० वाजता सुरू होईल. चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य आहे. चेन्नईने आतापर्यंत तीन चेंडूत चार धावा केल्या आहेत. त्यानुसार चेन्नईला ८७ चेंडूत १६७ धावांची गरज आहे. चेन्नईसाठी खास बाब म्हणजे त्यांच्या १० विकेट्स शिल्लक आहेत. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे क्रीजवर आहेत. गुजरातच्या प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येकी तीन षटके टाकावी लागतील. पॉवरप्ले चार षटकांचा असेल.
११.४५ वाजता अंपायर पुन्हा तपासणी करतील. त्यांनी १०.४५ वाजता पाहणी केली मात्र मैदान ओले असल्याने कोणताही निर्णय घेतला नाही. आता सामना कधी सुरू होणार हे 11:४० वाजता कळेल. ११.४५ नंतर षटके कापण्यास सुरुवात होईल.
अहमदाबादमधील चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाऊस थांबला आहे. सामना लवकरच सुरू होऊ शकतो. षटके कापली जाण्याची शक्यता नाही. कव्हर काढले आहेत. सुपर-सोपर्स त्यांचे काम करत आहेत. मात्र, काही ठिकाणी जमिनीवर पाणी साचले. ते सुकवण्याचे काम केले जात आहे. अशा परिस्थितीत पूर्ण २० षटकांचा सामना होऊ शकतो. गुजरातने चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रात्री १०.४५ वाजता अंपायर पाहणी करतील.
डकवर्थ-लुईस नियमानुसार, पाचव्या षटकाच्या शेवटी चेन्नईसाठी समान धावसंख्या असावी
म्हणजेच एकही विकेट न गमावता ४३ धावा, एक विकेट पडली तर ४८ धावा, दोन विकेट्स पडल्या तर ५५ धावा, तीन विकेट्स पडल्या तर ६५ धावा, चार विकेट पडल्या तर ७७ धावा आणि पाच विकेट्स पडल्या तर ९५ धावा. जमिनीवर जोरदार वारे वाहत असल्याने कव्हर अबाधित ठेवण्यासाठी ग्राउंड-कर्मचारी धडपडत आहेत. लक्षात ठेवा, आम्हाला अजून दोन तास बाकी आहेत, त्यानंतर षटके कापायला सुरुवात होईल.
४३/०
४८/१
५५/२
६५/३
७७/४
९५/५
सध्या मैदानात पाऊस थांबला असून मैदान पूर्वस्थितीत आणण्याचे काम सुरु आहे. खेळाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे पंचांकडून सांगण्यात आले आहे.
चेन्नई सुपर किंग्स ४-०

धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईच्या डावात पावसाने खोडा घातला असून खेळ थांबवण्यात आला आहे. ऋतुराजने शमीच्या पहिल्याच षटकात चौकार मारला. चाहते पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
चेन्नई सुपर किंग्स ४-०

तामिळनाडूच्या साई सुदर्शनने शतक हुकले तो ९६ धावा करून पाथिरानाने त्याला त्याच्याच गोलंदाजीवर पायचीत केले. त्याच षटकात आक्रमक फटका मारण्याच्या नादात राशिद खान ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर २१५ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.
गुजरात टायटन्स २१४-४
साई सुदर्शनने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने चौकारांसह अर्धशतक ठोकले. या मोसमातील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले. २१ वर्षीय सुदर्शन शानदार फलंदाजी करत आहे. सध्या हार्दिक पांड्या दोन चेंडूत एका धावेवर फलंदाजी करत असून साई सुदर्शनने ४० चेंडूत ७६ धावा केल्या आहेत. तुषार देशपांडेच्या एकाच षटकात २० धावा कुटल्या.
गुजरात टायटन्स १७३-२
मोठा फटका मारण्याच्या नादात ऋद्धिमान साहा ३९ चेंडूत ५४ धावा करून बाद झाला. दीपक चाहरच्या अखेरच्या षटकात अखेरच्या चेंडूवर धोनीने त्याचा अफलातून झेल घेतला. ६४ धावांची भागीदारी तोडण्यात चेन्नईला यश आले.
गुजरात टायटन्स १३१-२
११वे षटक गुजरातच्या नावावर होते. जडेजाच्या या षटकात एका चौकारासह एकूण ११ धावा काढल्या. गुजरातची धावसंख्या १०० पार झाली आहेे. ऋद्धिमान साहाने शुबमन बाद झाल्यानंतर आक्रमक फटकेबाजी सुरूच ठेवली. या आयपीएलमध्ये त्याने दुसरे अर्धशतक पूर्ण केले. सध्या तो ३७ चेंडूत ५३ धावांवर खेळत आहे.
गुजरात टायटन्स १२४-१
शुबमन गिल बाद झाल्यानंतरही १०च्या रनरेटने गुजरात धावा करत आहे. दहा षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर ८६ धावा आहे. सध्या ऋद्धिमान साहा २८ चेंडूत ३७ धावा करून क्रीजवर असून त्याला साई सुदर्शन साथ देत आहे.
गुजरात टायटन्स ९५-१
गुजरातला पहिला मोठा धक्का सातव्या षटकात बसला. धोनीच्या जबरदस्त स्टंपिंगपुढे शुबमन गिल काहीच करू शकला नाही. सातव्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर गिल मोठा फटका मारण्यासाठी बाहेर आला आणि ०.१२ सेकंदाच्या रिअॅक्शन टाइममध्ये ४१ वर्षीय धोनीने शुबमनला यष्टिचीत केले. त्याला २० चेंडूत ३९ धावा करता आल्या. शुबमनने आपल्या खेळीत सात चौकार मारले. चार धावांवर असताना दीपक चाहरनेही त्याचा झेल सोडला. मात्र, धोनीसमोर शुबमन सपशेल अपयशी ठरला.
गुजरात टायटन्स ६७-१
पॉवरप्ले मध्ये एकही विकेट न गमावता गुजरात टायटन्सने ६२ धावा केल्या आहेत. सध्या ऋद्धिमान साहा आणि शुबमन गिल हे दोन्ही सलामीवीर चेन्नईच्या गोलंदाजीवर तुटून पडले आहेत. दुसऱ्याच षटकात दीपक चाहरने शुबमनचा झेल सोडला. त्याचा फायदा घेत दोघेही खूप धावा करत आहेत.
गुजरात टायटन्स ६२-०
शुबमनचा झेल सोडल्यानंतर तिसऱ्या षटकात दीपक चाहरने स्वतःच्याच गोलंदाजीवर ऋध्दिमान साहाचा झेल सोडला. झेल सोडल्यानंतर या षटकात ऋध्दिमान साहाने जखमेवर मीठ चोळत त्याच षटकात १६ धावा कुटल्या. त्याने षटकात एक षटकार आणि एक चौकार लगावला.
गुजरात टायटन्स ५८-०
आयपीएलचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्यात आले. आता हा सामना सुरू झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघासमोर शुबमन गिल आणि ऋद्धिमान साहा यांचे आव्हान आहे. दीपक चाहरने चेन्नईच्या दुसऱ्याच षटकात शुबमनचा झेल सोडला. हे जीवदान चेन्नईला किती महागात पडणार सामन्यात पुढे कळेल.
गुजरात टायटन्स १८-०

चेन्नई सुपर किंग्स संघ: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), दीपक चाहर, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा
गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
आयपीएल २०२३मध्ये या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला तीन वेळा विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच सामने जिंकले आहेत. या मोसमात काही हाय-स्कोअरिंग लढती पाहिल्या आहेत. स्टेडियमच्या इतिहासानुसार, पाठलाग करणाऱ्या संघांना आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना समान यश मिळते. मात्र, येथे खेळल्या गेलेल्या गेल्या पाच सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे.
गुजरातचा कर्णधार हार्दिक म्हणाला, "मीही प्रथम गोलंदाजी केली असती, पण माझे मन मला फलंदाजी करायला सांगत होते, त्यामुळे नाणेफेक हरल्याने मला काही फरक पडला नाही. हवामान आपल्या नियंत्रणाबाहेर आहे त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. जो संघ चांगला खेळेल त्याला ट्रॉफी मिळेल. मला माझ्या खेळाडूंना शांत ठेवायला आवडते आणि तेही मला तेच सांगतात. ही खेळपट्टी सपाट आहे त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. तसेच आम्ही संघात कोणताही बदल केलेला नाही.
नाणेफेक दरम्यान धोनी म्हणाला, "पावसाची शक्यता पाहता आम्ही प्रथम गोलंदाजी करू. काल आम्ही ड्रेसिंग रूममध्ये होतो. क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला नेहमीच खेळायचे असते. सगळ्यात मोठी अडचण होती चाहत्यांना झाली. आशा आहे की आम्ही त्यांचे मनोरंजन करू शकू. खेळपट्टी बऱ्याच काळापासून झाकलेली आहे, परंतु संपूर्ण स्पर्धेत त्यावर धावा झाल्या असून आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आम्ही २० षटके खेळू याचा आम्हाला खूप आनंद आहे.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
आयपीएल २०२३चा समारोप सोहळा सुरु झाला आहे. संगीत निर्माते न्यूक्लिया यांनी रविवारी सादर केले. आज रॅपर-गायक किंग रोको परफॉर्म करत आहे. धोनी मैदानात येताच राजाने ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना रे, दिल से जुडा मत होना रे असा नारा दिला. धोनी मैदानात उतरताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. "तू मान मेरी जान, तुझे जाने ना दूंगा." हे गाण म्हणत असताना कॅमेऱ्याने धोनीला टिपलेे. खास त्याच्यासाठी त्याने हे गाणे गायले.

आयपीएल २०२३चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आहे. वेळापत्रकानुसार हा सामना २८मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता होणार होता. मात्र, पावसामुळे या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत आयपीएल २०२३च्या चॅम्पियनचा निर्णय राखीव दिवशी होईल. या सामन्यासाठी २९ मे हा राखीव दिवस आहे. त्याआधी आयपीएलच्या समारोप सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सामना जरी राखीव दिवशी असला तरी चाहत्यांचा उत्साह जबरदस्त आहे.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1663163805378174976?s=20
जेव्हापासून प्लेऑफ आणि क्वालिफायरचा नियम २०११ पासून लागू झाला. तेव्हापासून चेन्नईचा संघ २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशा चार वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. योगायोगाने, गेल्या तीन वेळा चेन्नईने अंतिम फेरी गाठली तेव्हा साखळी फेरीनंतर गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. यावेळीही चेन्नईने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नईचा संघ फायनलमध्ये पोहोचल्यानंतर चॅम्पियन बनला होता. आता चेन्नईला यावेळी विक्रम कायम राखता येतो का, हे पाहावे लागेल.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1663161439136387075?s=20
चेन्नई सुपर किंग्ज: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), आकाश सिंग, मोईन अली, भगत वर्मा, दीपक चाहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, सिसंदा मगला, अजय मंडल, मथिशा पाथीराना, ड्वेन प्रिटोरियस, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, अंबाती रायुडू, मिचेल सँटनर, सुभ्रांशु सेनापती, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महिष टीक्षाना.
गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप संगवान, दर्शन नालकांडे. जयंत यादव, आर. साई किशोर, नूर अहमद, दासून शनाका, ओडियन स्मिथ, के.एस. भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशुआ लिटल आणि मोहित शर्मा.
अहमदाबादमध्ये संध्याकाळी ६ वाजता ढगाळ वातावरण आहे. AccuWeather च्या अहवालानुसार रात्री १० वाजेपर्यंत ढगाळ वातावरण राहील. मात्र, अहवालात पावसाची शक्यता नाही. रिपोर्टनुसार, अहमदाबादमध्ये सध्या खूप उष्णता आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे काल रात्री १०.४५ वाजल्यापासून पाऊस झालेला नाही.
Chennai Super Kings vs Gujarat Titans IPL Final Highlights Score Updates: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल २०२३ फायनल हायलाइट्स मॅच अपडेट्स
चेन्नई सुपर किंग्जने गुजरातचा ५ विकेट्स राखून पराभव करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. चेन्नईला शेवटच्या दोन चेंडूत १० धावांची गरज होती आणि रवींद्र जडेजाने षटकार आणि चौकार मारून आपल्या संघाला चॅम्पियन बनवले.