आयपीएल अर्थात इंडियन प्रिमीयर लीगचा १५ वा हंगाम येत्या २६ मार्चपासून सुरु होतोय. यंदाच्या हंगामात दोन नव्या संघाची भर पडल्यामुळे सामने रोहमर्षक होणार आहेत. यावेळी सर्वच संघात थोडेफार बदल करण्यात आले आहेत. विराट कोहलीच्या रॉयर चॅलेंजर्स बंगळुरु या संघामध्ये तर मोठा फेरबदल करण्यात आलाय. लवकरच आरसीबीला नवा कर्णधार मिळणार आहे. त्यासाठी येत्या १२ मार्चला पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

विराटने आयपीएल २०२१ नंतर संघाचे कर्णधारपद सोडलेले असून आरसीबी आपला पहिला सामना २७ मार्च रोजी पंजाब विरोधात खेळणार आहे. या अगोदर संघाचा कर्णधार निश्चित करणे गरजेचे आहे. याच कारणामुळे साऊथ आफ्रिकन खेळाडू डू प्लेसीसचे नाव कर्णधार म्हणून निवडण्यात आलेय. येत्या १२ मार्चला आरसीबीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून यामध्ये कर्णधार म्हणून प्लेसीसचे नाव जाहीर केले जाणार आहे. आयपीएल २०२१ नंतर कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासून हे पद रिकामेच आहे.

डू प्लेसीसचे नाव कर्णधारपदासाठी निश्चित होण्याअगोदर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या गळ्यात आरसीबीच्या कर्णधारपदाची माळ पडणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र तीन सामन्यांमध्ये मॅक्सवेलची उपस्थिती नसेल. याच कारणामुळे संघाने डू प्लेसीसचा कर्णधारपदासाठी विचार केल्याचं समजतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, डू प्लेसीस साऊथ आफिकन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असल्याने त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. क्रिकेटच्या एकदीवसीय, टी-२०, आणि कसोटी अशा तीनही प्रकारात कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. चेन्नई सुपरकिंग्स या संघाकडून खेळताना तो फलंदाजीसाठी सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेला आहे. विराटनंतर याच डू प्लेसीसकडे संघाचे नेतृत्व जाणार असल्यामुळे आगामी काळात बंगळुरु संघ यंदाच्या हंगामात काय जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.