मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या. बुमराहची आयपीएलमध्ये पाच विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे, यासह त्याने आयपीएलमध्ये अशी कामगिरी केली जी गेल्या १७वर्षांत कोणीही करू शकले नाही. बुमराहच्या ५ विकेटमध्ये विराट कोहलीच्या महत्त्वाच्या विकेटचाही समावेश आहे. कोहली तिसऱ्या षटकात केवळ ३ धावा करून बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
– quiz
जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकात विराट कोहलीला झेलबाद करत आपली पहिली विकेट मिळवली. यानंतर त्याने कर्णधार फाफ डुप्लेसिस (६१), लोमरोर (०) यांना एका षटकात लागोपाठ बाद केले. त्यानंतर सौरव चौहान (९) आणि विजय कुमार (०) यांनाही लागोपाठ झेलबाद केले. बुमराहला या सामन्यात दोन वेळा हॅटट्रिक घेण्याची संधी मिळाली, पण दोन्ही वेळा ही संधी हुकली. बुमराहने ४ षटकात २१ धावा देत ५ विकेट्स मिळवले.
आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहने एका डावात ५ विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. बुमराहने पहिल्यांदा २०२२ मध्ये केकेआरविरूद्धच्या सामन्यात ५ विकेट्स घेतले होते. बुमराह हा आयपीएलमध्ये २ वेळा ५ विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज आहे. बुमराहने १२५ सामन्यांमध्ये २ वेळा ५ विकेट्स घेतले आहेत.
जसप्रीत बुमराहने आयपीएलच्या इतिहासात आरसीबीविरुद्ध एका डावात ५ विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याचसोबत आरसीबीविरूद्ध बुमराहने सर्वाधिक २९ विकेट्स घेतले आहेत.