चंडीगड : भीषण अपघातातून बचावल्यानंतर दृढ निश्चय आणि जिद्दीच्या जोरावर वर्षभराहूनही अधिक कालावधीनंतर ऋषभ पंत आज, शनिवारी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज दुपारच्या सत्रात पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघासमोर पंजाब किंग्जचे आव्हान असेल. पंत या सामन्यात कर्णधार, फलंदाज आणि यष्टिरक्षक अशा तिहेरी भूमिकेतच दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

हेही वाचा >>> IPL 2024 : कमिन्स विरुद्ध स्टार्क द्वंद्व; श्रेयसच्या नेतृत्वाखालील कोलकाताची आज हैदराबादशी गाठ

डिसेंबर २०२२ मध्ये पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापती झाल्या. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्रदीर्घ पुनर्वसन कार्यक्रमातून त्याला जावे लागले. मात्र, अपेक्षित होते त्यापेक्षाही कमी कालावधीत तंदुरुस्ती प्राप्त करत पंत आता ‘आयपीएल’मधून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘बीसीसीआय’ने पंतला यष्टिरक्षक म्हणून खेळण्याची परवानगी दिली आहे. परंतु यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी, पंतला सुरुवातीच्या काही सामन्यांत केवळ फलंदाज म्हणून खेळवले जाऊ शकेल, असे संकेत दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉिन्टगने दिले होते. त्यामुळे दिल्लीचे संघ व्यवस्थापन पंतला यष्टिरक्षक म्हणून खेळवणार की केवळ फलंदाज म्हणून, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पंतला यष्टिरक्षण करू द्यायचे नसल्यास दिल्लीकडे वेस्ट इंडिजचा शाय होप, दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्ज आणि नवोदित कुमार कुशाग्र यांचा पर्याय उपलब्ध आहे.

हेही वाचा >>> IPL 2024 CSK vs RCB: चेन्नईची विजयी सलामी; मुस्तफिझूर रहमान विजयाचा शिल्पकार

गेल्या ‘आयपीएल’ हंगामात पंतच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने दिल्लीचे नेतृत्व केले होते. १० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दिल्लीचा संघ नवव्या स्थानी राहिला. त्यामुळे आता पंतकडे नेतृत्वाची धुरा पुन्हा सोपवण्यात आली आहे. पंतसाठी यंदाचे ‘आयपीएल’ महत्त्वाचे ठरणार आहे. या स्पर्धेनंतर लगेचच ट्वेन्टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे झाल्यास पंतला ‘आयपीएल’मध्ये आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागले आणि फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल.

दिल्ली आणि पंजाब हे दोनही संघ यंदा ‘आयपीएल’ जेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचा प्रयत्न करतील. या दोनही संघांना अद्याप एकदाही ‘आयपीएल’चा करंडक उंचावता आलेला नाही. पंजाब संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळेल.

पंजाबची गोलंदाजी मजबूत

पंजाब संघाला यंदा यशस्वी कामगिरी करायची झाल्यास, त्यांच्या गोलंदाजांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पंजाबकडे कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, सॅम करन, हर्षल पटेल आणि नेथन एलिस यांसारखे गुणवान वेगवान गोलंदाज आहेत. मुल्लंपूर येथील नव्या स्टेडियमवरील खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत अपेक्षित आहे. याचा फायदा करून घेण्याचा पंजाबच्या गोलंदाजांचा प्रयत्न असेल. त्यांना लेग-स्पिनर राहुल चहरची साथ लाभेल. पंजाबच्या फलंदाजीची मदार कर्णधार शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लििव्हगस्टोन आणि जितेश शर्मा यांच्यावर असेल.

दिल्लीची वॉर्नर, कुलदीपवर भिस्त

दिल्लीकडे आक्रमक शैलीत खेळणाऱ्या फलंदाजांची संख्या मोठी आहे. अनुभवी वॉर्नर आणि पृथ्वी शॉ सलामीला येणे अपेक्षित आहे. वॉर्नरकडे दिल्लीचा सर्वात भरवशाचा फलंदाज म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्याच्याकडून दमदार कामगिरीची दिल्लीला अपेक्षा असेल. मधल्या फळीत पंत, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्ज यांसारखे फलंदाज खेळतील. दिल्लीच्या गोलंदाजीची भिस्त दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आनरिख नॉर्किए आणि भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव यांच्यावर असेल. तसेच मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांच्याकडूनही चांगली कामगिरी अपेक्षित आहे. ’ वेळ :  दु. ३.३० वा.  ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अ‍ॅप