जयपूर : दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात राजस्थान रॉयल्सशी होणार असून या वेळी संघाचा प्रयत्न पहिला विजय मिळवण्याचा असेल. त्यासाठी दिल्लीच्या फलंदाजांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. यासोबत सर्वांचे लक्ष कर्णधार ऋषभ पंतकडे राहील. त्यामुळे त्याच्या नेतृत्वगुणांचा कस या सामन्यात लागेल.

दुखापतीतून सावरल्यानंतर पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंतने १३ चेंडूंचा सामना करताना १८ धावा केल्या. पंतने यष्टिरक्षणातही प्रभावित करताना जितेश शर्माला बाद केले. त्यामुळे राजस्थानविरुद्ध चांगली कामगिरी करण्यास पंत उत्सुक असेल. पंतला लय सापडल्यास संघालाही त्याचा फायदा होईल. पंतला या वेळी ट्रेंट बोल्ट, रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहल यांसारख्या अनुभवी गोलंदाजांचा सामना करायचा आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर इतर फलंदाजांची साथ त्याला अपेक्षित असेल. राजस्थानचा संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने दिल्लीचा संघ त्यांना हलक्याने घेणार नाही. त्यामुळे सर्वच आघाडयांवर संघाला कामगिरी उंचवावी लागेल.

हेही वाचा >>> IPL 2024 : गावस्कर यांच्यापाठोपाठ आता चेन्नईचे प्रशिक्षक हसीदेखील प्रभावित; ऋतुराज गायकवाड क्रिकेट जाणणारा माणूस

वॉर्नर, मार्शवर मदार

मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांच्यासह डावाची सुरुवात केली होती. या दोघांनीही चांगली सुरुवात केली. पण, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना घेता आला नाही. त्यामुळे संपूर्ण दबाव पुनरागमन करणाऱ्या पंतवर आला. राजस्थानविरुद्ध संघाला भक्कम सुरुवात देण्याची जबाबदारी या दोघांवर असेल. गेल्या लढतीत यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलने नाबाद ३२ धावांची खेळी केली व त्यामुळे संघाला ९ बाद १७४ धावसंख्येपर्यंत पोहोचता आले. पोरेलचा वापर ‘प्रभावी खेळाडू’ म्हणून केल्याने दिल्लीचा एक गोलंदाज कमी झाला. त्यातच इशांत शर्माला दुखापत झाल्याने संघाच्या अडचणीत भर पडली. दुखापतीमुळे इशांत काही सामने बाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुलदीप यादव अक्षर पटेल यांच्यावर संघाच्या गोलंदाजीची मदार असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जैस्वाल, बटलरकडे लक्ष

गेल्या सामन्यात सवाई मानसिंह स्टेडियमच्या खेळपट्टीवर राजस्थानच्या जोस बटलर व यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीला लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांविरुद्ध अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दिल्लीविरुद्ध त्यांचा प्रयत्न आपली कामगिरी उंचावण्याचा राहील. गेल्या लढतीत संजू सॅमसनने नाबाद ८२ धावांची खेळी केली होती व त्यामुळेच संघाला विजय मिळवण्यात यश मिळाले. या कामगिरीमुळे सॅमसनने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून आपली दावेदारी केली आहे. रेयान परागही चांगल्या लयीत दिसत आहे. राजस्थानच्या फलंदाजांना रोखायचे झाल्यास कुलदीप व अक्षर यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा यांनीही गोलंदाजीत चमक दाखवली आहे. * वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.