Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: लखनऊ सुपर जायंट्सला आयपीएल २०२४ मधील सर्वात मोठ्या आणि लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १६५ धावांपर्यंत मजल मारली, तर सनरायझर्स हैदराबादने एकही विकेट न गमावता केवळ ९.४ षटकांत हे लक्ष्य गाठले. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने लखनऊवर एकतर्फी विजय मिळवला. या पराभवानंतर लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुल काय म्हणाला, जाणून घ्या.

सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या पराभवानंतर केएल राहुल म्हणाला की, “माझ्याकडे शब्द नाहीयत. अशी फलंदाजी आपण फक्त टीव्हीवर पाहिली होती. पण ही एक अविश्वसनीय फलंदाजी होती. प्रत्येक चेंडू जणू काही त्यांच्या बॅटच्या मधोमध आदळत असल्यासारखे वाटत होते. हेड आणि अभिषेकच्या फलंदाजीचे खूप कौतुक. त्यांनी षटकार मारण्याच्या कौशल्यावर खूप काम केले आहे. त्यांच्या वादळी फलंदाजीने दुसऱ्या डावात खेळपट्टी कशी खेळत आहे हे समजून घेण्याची संधीच दिली नाही. पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी सुरू करायची हे ठरवून ते मैदानात उतरले होते. त्यामुळे त्यांना रोखण्याची संधी आम्हाला मिळाली नाही.”

हेही वाचा- IPL 2024: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर मुंबई इंडियन्स संघातील वरिष्ठ नाराज

“माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत…” केएल राहुल

केएल राहुल पुढे म्हणाला, “एकदा तुम्ही सामना गमावला की, तुमच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या सामन्यात आम्ही अंदाजे ४० ते ५० धावा कमी केल्या. पॉवरप्लेमध्ये विकेट गमावल्यानंतर आम्हाला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांनी चांगली फलंदाजी केली आणि आम्हाला १६६ पर्यंत नेले पण आम्ही २४० धावा जरी केल्या असत्या तरी त्यांनी त्याचा यशस्वी पाठलाग केला असता.”

हैदराबादने १० विकेट्सने केलेल्या मोठ्या पराभवामुळे लखनऊ सुपर जायंट्स संघाचा नेट रन रेट लक्षणीयरीत्या खालावला आहे, जो आता -०.७६९ झाला आहे. अशा परिस्थितीत संघाला प्लेऑफ गाठण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी शेवटचे २ सामने जिंकणे आवश्यक आहे. लखनऊचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे आणि १२ सामन्यांत ६ विजय आणि ६ पराभवांसह १२ गुण मिळवले आहेत. आता त्यांना १४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि १७ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहे.