Kuldeep Yadav Slap Rinku Singh Video IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये २९ एप्रिलला झालेल्या सामन्यात केकेआरने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. यासह केकेआर आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. पण या सामन्यानंतरचा एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कुलदीप यादवने रिंकू सिंगच्या कानशिलात लगावली आहे. एकदा नव्हे तर दोनदा कुलदीपने रिंकूला मारल्याचा व्हीडिओ समोर येत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाल्यानंतर कुलदीप यादवने मैदानात बोलताना रिंकू सिंगला दोनदा कानाखाली मारली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल २०२५ चा ४८ वा सामना दिल्ली आणि कोलकाता यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये कोलकाताने दिल्लीचा १४ धावांनी पराभव केला. सामना संपल्यानंतर कोलकात्याचा रिंकू आणि दिल्लीचा कुलदीप मैदानावर बोलत असल्याचे दिसून आले आणि यादरम्यान भारतीय स्टार कुलदीपने अचानक रिंकूला कानाखाली मारली.

सुरुवातीला दोघेही हसताना दिसले पण पहिल्या कानशिलात लगावल्यानंतर कुलदीपचे शब्द ऐकताच, रिंकूची प्रतिक्रिया अचानक बदलली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. काही सेकंदांनंतर, कुलदीपने रिंकूच्या गालावर पुन्हा एकदा कानाखाली दिली, त्यानंतर तो कुलदीपशी काहीतरी गंभीर विषयावर बोलत असल्याचे दिसून आले.

कुलदीप-रिंकूचं बोलणं फारसं काही गंभीर नव्हतं. दोघंही कोणत्यातरी विषयावर बोलताना दिसले. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अनेकांना आयपीएलच्या पहिल्या सीझनची आठवण झाली, जेव्हा २००८ मध्ये हरभजन सिंगने मैदानात रागाच्या भरात श्रीशांतला कानशिलात लगावली होती.

दिल्ली कॅपिटल्स वि. केकेआर सामन्यात रिंकू सिंगने २५ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. त्याने मधल्या षटकांमध्ये कुलदीपच्या गोलंदाजीवर चांगली फलंदाजी करत संघाच्या धावांमध्ये भर घातली. ११ व्या षटकात रिंकूने कुलदीपच्या गोलंदाजीवर षटकात चौकार मारला.

१५ व्या षटकात रिंकूने कुलदीपची चांगलीच धुलाई केली. रिंकूने त्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार लगावला आणि त्याच्या षटकात १७ धावा दिल्या. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २०४ धावा केल्या, प्रत्युत्तरात दिल्ली संघ २० षटकांत ९ बाद केवळ १९० धावाच करू शकला.