MI vs DC, IPL 2025 Playoffs: मुंबई इंडियन्सने करून दाखवलं आहे. गेल्या हंगामात सर्वात शेवटी राहिलेला मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२५ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव केला आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानावर आली. या जोडीकडून दमदार सुरुवातीची गरज होती. मात्र, रोहित शर्मा अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. तर रायन रिकल्टनने २५ धावांची खेळी केली. सलामी जोडी मघाफी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव शेवटपर्यंत उभा राहिला.
ज्या खेळपट्टीवर मोठे फटके खेळणं कठीण होतं, त्या खेळपट्टीवर शेवटी सूर्यकुमार यादवने चौकार – षटकारांचा पाऊस पाडला. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याला साथ देत नमन धीरने ८ चेंडूत २४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबईने २० षटकांअखेर ५ गडी बाद १८० धावा केल्या.
मुंबईचा प्लेऑफमध्ये प्रवेश
दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी १८१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीला हवी तशी सुरूवात करता आली नाही. केएल राहुल अवघ्या ११ धावांवर तंबूत परतला. तर फाफ डू प्लेसिस ६, अभिषेक पोरेल ६ धावांवर माघारी परतला. विपराग निगमने आक्रमक फटकेबाजी करत २० धावा चोपल्या. शेवटी समीर रिझवी आणि आशुतोष शर्माने संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र मुंबईचे गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांवर भारी पडले. मिचेल सँटनर, ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या.
प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ ठरले
या सामन्याआधी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या ३ संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. आता दिल्लीला नमवत मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे.