Operation Sindoor Impact On IPL 2025: भारताने पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीन सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि ते यशस्वीरित्या पूर्ण देखील केलं आहे. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी आणि त्यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आणि या हवाई हल्ल्यातून ९ दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. या हल्ल्यानंतर सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. खबरदारी म्हणून केंद्र सरकारने, सीमालगत असलेल्या राज्यांतील विमानतळं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या हल्ल्याचा परिणाम आता आयपीएल स्पर्धेवरही झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारतात आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. येत्या ११ मे रोजी धरमशालेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. मात्र हे तणावपूर्ण वातावरण पाहता, हा सामना रद्द होणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.
विमानतळ बंद असल्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ धरमशालेला पोहोचू शकणार नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणारा हाय व्होल्टेज सामना आता अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल म्हणाले, ” हो, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यादरम्यान होणारा सामना हा गुजरातमध्ये खेळवला जाईल.”
मुंबईला पुढील सामना ११ मे रोजी खेळायचा आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ बुधवारी संध्याकाळी धरमशालेला जाण्यासाठी रवाना होणार होता. मात्र, धरमशाला विमानतळ बंद असल्याने मुंबईचा संघ सध्या मुंबईतच आहे. या सामन्यासाठीचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जचं टेन्शन वाढलं आहे. कारण हे दोन्ही संघ सध्या धरमशालेत आहे. हा सामना झाल्यानंतर, दोन्ही संघ इथून बाहेर कसे पडणार? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
एका संघ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना विश्रांती मिळणार आहे की नाही हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कारण हा एक लांबचा पल्ला असणार आहे. त्यामुळे खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही.
संघ अधिकारी म्हणाले की, “आम्हाला खेळाडूंच्या विश्रांतीचाही विचार करावा लागेल. आम्हाला लहान बसेसचा वापर करून डोंगराळ भागातून प्रवास करावा लागेल. हा प्रवास दोन गटात विभागला जाऊ शकतो, पण अजूनपर्यंत कुठलाही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण दिल्ली आणि पंजाबचा सामना झाल्यानंतर या दोन्ही संघांना लगेचच आपला पुढील प्रवास सुरू करावा लागणार आहे.”