Preity Zinta Net Worth : ‘दिल से’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली प्रीती झिंटा आज आयपीएलमुळे चर्चेत आहे. तिच्या गालावरच्या खळीने तिने अनेकांना घायाळ केलंय. ऐश्वर्या राय, रानी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, करीना कपूरसारख्या तिच्या समवयस्क अभिनेत्रींना तिने तिच्या उमेदीच्या काळात टफ फाईट दिली होती. आज ती यशस्वी अभिनेत्री, यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखली जाते.
शिमला येथील मुळची असलेल्या प्रीती झिंटावर वयाच्या १३ व्या वर्षी तिच्या वडिलांचं निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबारी येऊन पडली. १९९८ मध्ये दिल से चित्रपटात तिने शाहरुख खानबरोबर तगडं काम करून तिने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यानंतर तिने कल हो ना हो, वीर झारा, लक्ष्य, सलाम नमस्ते, संघर्ष, कोई…मिल गया, क्या केहना, कभी अलविदा ना केहना,चोरी चोरी चुपके, चुपके, दि लास्ट लिअर, सोल्जर आदी अनेक चित्रपटात काम केलंय.
प्रीती झिंटाला तिच्या अभिनयामुळे खरी ओळख मिळाली असली तरीही तिची तेवढ्यापुरतीच ओळख मर्यादित नाही. तिने तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यात असे अनेक निर्णय घेतलेत, ज्यामुळे ती सतत चर्चेत राहिलीय. यामध्ये ६०० कोटी रुपयांची संपत्ती नाकारपण्यापासून थेट छोटा शकीलशी पंगा घेण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.
प्रीती झिंटाने नाकारली होती ६०० कोटी रुपयांची संपत्ती
चित्रपट निर्माते कमल अमरोही यांचा मुलगा शानदार अमरोही प्रीती झिंटाला मुलगी मानत होते. २०११ मध्ये शानदार अमरोही यांनी त्यांची ६०० कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्या मृत्यूनंतर प्रीती झिंटाला देण्याची घोषणा केली होती. महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वतःची मुलं असूनही त्यांनी त्यांची संपत्ती प्रीती झिंटाच्या नावे करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रीती झिंटा नेस वाडियाला डेट करत होती तेव्हा शानदार अमरोही प्रीती झिंटाला पहिल्यांदा भेटले होते. अमरोही यांचं त्यांच्या भावंडांबरोबर जेव्हा भांडण झालं होतं तेव्हा प्रीती त्यांच्या समर्थनार्थ उभी राहिली होती. तेव्हापासून यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले. शानदार अमरोही सतत तिला नवनवे गिफ्ट्स पाठवू लागले. त्यामुळे प्रीती त्याच्या कुटुंबातील एक सदस्य बनली होती. तसंच, शानदार यांच्या निधनानंतर त्यांची संपूर्ण संपत्ती प्रीतीच्या नावे करण्याचीही शानदार यांनी तयारी दाखवली. पण प्रीतीने ही संपत्ती नाकारली. एवढंच नव्हे तर शानदार अमरोहीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाविरोधात प्रीती झिंटाने पोलीस तक्रारही केली होती. अमरोहीच्या उपचारांकरता प्रीतीने २ कोटींचं कर्ज दिलं होतं, ते कर्ज परत घेण्याकरता तिने ही तक्रार केली होती.
छोटा शकीलशी पंगा
प्रीती झिंटा तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे ओळखली जातेच, पण ती तिच्या थेट आणि बिनधास्त वागणुकीमुळे अधिक ओळखली जाते. तिने चोरी चोरी छुपके छुपके या चित्रपटाच्या वेळी थेट छोटा शकील याच्याशी पंगा घेतला होता. या चित्रपटात सलमान खान, राणी मुखर्जीही होते. या चित्रपटाचे निर्माते भरत शाह यांना चित्रिकरणादरम्यान अटक झाली होती. कारण त्यांनी या चित्रपटासाठी छोटा शकीलकडून पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणादरम्यान अनेक मोठ मोठे कलाकार शांत होते, या प्रकरणापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा प्रीती झिंटाकडून छोटा शकील गँगकडून खंडीणी मागण्यात आली होती. पण तरीही तिने त्यांच्या या खंडणीला भीक घातली नाही. तिने थेट छोटा शकीलशी पंगा घेतल्याने तिच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. खुद्द लालकृष्ण अडवाणी यांनी तिला सुरक्षा घेण्याचे आवाहन केले होते. तरीही तिने कोणतीही सुरक्षा घेण्यास नकार दिला. तिच्या या बिनधास्त वृत्तीला पाहून तिला गॉडफ्रे फिलिप्स नॅशनल ब्रेवरी पुरस्कारही देण्यात आला होता.
प्रीतीचं बॉलिवूडमधील करिअर कसं होतं?
२००० च्या दशकात प्रीती झिंटा बॉलिवूडमधील मुख्य अभिनेत्री होती. २०११ मध्ये तिने स्वतःची निर्मिती कंपनी स्थापन केली. एवढं सगळं यश मिळवूनही प्रीती झिंटाने वयाच्या ३२ व्या वर्षी या क्षेत्रातून निवृत्ती घेतली. कारण तिला तिच्या व्यवसाय आणि आयपीएल क्रिकेट टीमकडे सर्वाधिक लक्ष द्यायचं होतं.
२०१६ मध्ये प्रीती झिंटाने जेन गुडइनफ याच्याबरोबर लग्नगाठ बांधली. लॉस एंजलेस येथे छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी लग्न केले. तर, २०२१ मध्ये तिने तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठी गुड न्यूज शेअर केली. २०२१ मध्ये ती जुळ्या मुलांची आई झाली होती. सरोगसीद्वारे तिने या मुलांना जन्म दिला होती. मुलाचं नाव जय आणि मुलीचं नाव जिआ असं ठेवलं आहे.
दरम्यान, वयाच्या पन्नाशीत पोहोचलेल्या प्रीती झिंटाने आता पुन्हा एकदा चित्रपटात कमबॅक केलं आहे. राजकुमार संतोषी यांच्या लाहोर १९४७ मध्ये ती दिसणार आहे. तिच्याबरोबर सनी देओल, अमिर खान, शिल्पा शेट्टी, अली फझल आणि शबाना आझमी सहकलाकार आहेत. हा चित्रपट खरंतर २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव जून २०२५ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
प्रीती झिंटा आणि आयपीएल
दरम्यान, प्रीती झिंटाचं आयपीएलमधील भागीदारीही तितकीच चर्चेत राहिली आहे. २००८ मध्ये तिने पंजाब किंग्स ही आयपीएलची टीम विकत घेतली. ती या टीमची सहमालकीण आहे. त्यावेळी तिने ३५ कोटींची या टीममध्ये गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक आता जवळपास ३५० कोटींपर्यंत वाढली आहे. २००८ मध्ये पंजाब किंग्सची जव्हा स्थापना झाली तेव्हा ७६ मिलिअन डॉलरमध्ये याची खरेदी करण्यात आली होती. तर, २०२२ मध्ये याची किंमत ९२५ मिलिअन डॉलरपर्यंत झाली होती.
प्रीती झिंटाची संपत्ती
प्रीती झिंटा अनेक संपत्तीची मालक आहे. हाऊसिंग डॉट कॉमच्या वृत्तानुसार, मुंबईतील पाली हिल्स येथे १७.१ कोटींचा बंगला आहे. तर शिमल्यातही तिचं एक घर आहे. त्याची किंमत जवळपास ७ कोटी रुपये असेल. लग्नानंतर प्रीती लॉस एंजलसमध्ये शिफ्ट झाली होती. तिथेही तिच्या पतीचं बेवर्ली हिल्समध्ये मोठं घर आहे.
प्रीती झिंटा जवळपास सर्व सामन्यांमध्ये तिच्या खेळाडूंना चिअर करताना दिसते. प्रीतीची टीम २०२५ च्या आयपीएलच्या सामन्यात अंतिम सामन्यापर्यंत पोहचली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार प्रीती झिंटाची नेटवर्थ १८३ कोटी आहे. अभिनय, बिझनेस आणि ब्रॅण्ड एंडोर्समेंटच्या माध्यमातून ती कमावते.
प्रीती झिंटाचं कार कलेक्शन
प्रीतीला लक्झरी कारचं प्रचंड आकर्षण आहे. तिच्याकडे लेक्सस एलएक्स ४०० क्रॉसओव्हर कार आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे पोर्शे, मर्सिडिज बेंज, बीएमडब्ल्यूसुद्धा आहे.