IPL 2022 PBKS vs GT match result : टाटा आयपीएल २०२२ च्या या हंगामात आज (८ एप्रिल) १६ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा ६ विकेटने पराभव केला. गुजरातच्या या विजयात शुभमन गिल आणि राहुल तेवतियाने महत्त्वाची भूमिका निभावली. आयपीएलच्या या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरूद्ध लढले. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाबने २० षटकात ९ बाद १८९ धावा केल्या. यानंतर गुजरातने ६ विकेट राखत अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत १९० धावा केल्या आणि सामना आपल्या खिशात टाकला.

मयांक अग्रवाल ९ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. त्याला हार्दिक पंड्याने बाद केलं. जॉनी बेयरस्टोने ८ चेंडूत ८ धावा केल्या. त्याला लोकी फर्गसनने बाद केलं. पंजाबला तिसरा झटका शिखर धवनच्या रुपात मिळाला. शिखर धवनने ३० चेंडूत ३५ धावा केल्या. त्याला रशिद खानने बाद केलं. लियाम लिव्हिंगस्टोनने २७ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी केली. जितेश शर्माने ११ चेंडूत २३ धावांची खेळी केली. ओडेन स्मिथला तर आपलं खातही खोलता आलं नाही. तो पहिल्याच चेंडूवर तंबुत परतला. शाहरुख खानने ८ चेंडूत १५ धावा काढल्या. रबाडालाही एकच धाव करता आली, तर वैभव अरोराने २ धावा केल्या. राहुल चहर आणि अर्शदीप सिंह नाबाद राहिले. चहरने १४ चेंडूत २२ धावा, तर अर्शदीपने ५ चेंडूत १० धावा केल्या.

गुजरात टायटन्सची फलंदाजी

१९० धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने ५९ चेंडूत तुफान फटकेबाजी करत ९६ धावा केल्या. साई सुदर्शनने ३० चेंडूत ३५ धावा, तर हार्दिक पंड्याने १८ चेंडूत २७ धावा केल्या. मॅथ्यू वेडने ७ चेंडूत ६ धावा केल्या. हा सामना गुजरातच्या खिशात घालण्यात जेवढी मोठी भूमिका शुभमन गिलची राहिली तेवढीच मोठी भूमिका अखेरच्या दोन चेंडूत सामना फिरवणाऱ्या राहुल तेवतियाची राहिली. त्याने ३ चेंडूत १३ धावा केल्या. यातील १२ धावा अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी १२ धावा लागत असताना काढल्या.

गुणतालिकेत कोणता संघ कोठे?

गुजरातने या विजयासह सामना जिंकण्याची हॅट्रिक केली. आतापर्यंत ३ पैकी ३ सामने जिंकत गुजरातने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज या पराभवासह चौथ्या स्थानावरून सहाव्या स्थानावर गेलाय. पंजाबने आतापर्यंत ४ सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी २ सामन्यात विजय मिळवला.

दोन्ही संघात काय बदल?

गुजरातच्या संघात दोन बदल करण्यात आले. विजयशंकर आणि वरुण आरोन यांच्या जागेवर साईं सुदर्शन आणि दर्शन नालकंडे यांना संधी देण्यात आली आहे. पंजाबच्या संघात एक बदल करण्यात आला. भनुका राजपक्षेच्या जागेवर जॉनी बेयरस्टोला संधी देण्यात आली आहे.

पंजाब किंग्जचे प्लेईंग ११ (Punjab Kings Playing XIs) –

मयांक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ओडेन स्मिथ, अर्शदीप सिंह, राहुल चहर, कगिसो रबाडा, वैभव अरोरा

हेही वाचा : …अन् त्याने मला १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवलं; चहलने सांगितला ‘थोडक्यात जीव वाचला’वाला किस्सा

गुजरात टायटन्स प्लेइंग ११ (Gujarat Titans Playing XIs) –

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक) राहुल तेवतिया, साईं सुदर्शन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, रशिद खान, दर्शन नालकंडे, लोकी फर्गसन, मोहम्मद शमी</p>