IPL 2025 Virat Kohli Musheer khan Video: पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा दारूण पराभव करत आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आरसीबीने पंजाब किंग्सच्या फलंदाजीला सुरूंग लावत १४.१ षटकांत १०१ धावांवर संघाला सर्वबाद केलं. यानंतर फिल सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अवघ्या १० षटकांत संघाने विजयाची नोंद केली. पण या सामन्यादरम्यानचा विराटचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यावरून त्याला ट्रोल केलं जात आहे.

पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सचे सर्व फलंदाज फेल ठरले, तिथे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नव्या खेळाडूला मैदानात पाठवलं. हा नवा खेळाडू होता मुंबईचा मुशीर खान. ज्याने आरसीबी विरूद्ध सामन्यात पदार्पण केलं. अचानक मुशीरला मैदानावर पाहून सगळेच थोडे चकित झाले. यानंतर विराटने मुशीरकडे पाहत जे हातवारे केले, त्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय.

मुशीरने आयपीएलच्या चालू हंगामात यापूर्वी एकही सामना खेळलेला नाही. पंजाबने त्यांची फलंदाजी फळी कोसळल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ९व्या षटकात त्याला मैदानावर पाठवलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाने फक्त ६० धावांत आपले सहा विकेट गमावले. मुशीरचं फक्त हे आयपीएल पदार्पण नव्हतं, तर तो पहिलाच टी-२० सामनादेखील खेळणार होता.

शशांक सिंगला सुयश शर्माने बाद केल्यानंतर मुशीर फलंदाजीसाठी आला. या २० वर्षीय खेळाडूला क्रीजवर पाहून कोहली चकित झाला. मुशीर खान त्यानंतर स्ट्राईक घेत असताना विराट कोहली मागून हातवारे करताना दिसला. ज्यावर अनेकांनी असा दावा केला आहे की कोहली मुशीरला तो संघाचा वॉटरबॉय असल्याचे म्हणत आहे आणि विराटचे हावभावही अगदी सारखेच आहेत. या व्हीडिओमध्ये विराट कोहली आधी सांगत आहे की, “अरे हा आताच मला पाणी देऊन गेला. तर पुढे विराट म्हणतोय अरे हा पाणी देऊन गेला…”, असं चाहते म्हणत आहेत.

विराटची अॅक्शन तशी दिसत असली तरी स्टम्प माईकवर त्याचा आवाज स्पष्टपणे आला नाही. काही वेळापूर्वी मुशीर खान मैदानावरील फलंदाजांसाठी ड्रिंक्स घेऊन पोहाचला होता आणि अचानक त्याला पदार्पणाची संधी मिळाली. पण विराट कोहलीसारख्या महान खेळाडूला एका ज्युनियर खेळाडूला असं बोलणं शोभत नसल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. तर काही चाहते म्हणत आहेत की विराट कोहली सांगतोय, अरे हा मला आताच थोड्यावेळापूर्वी पाणी देऊन गेला आणि विराटला विनाकारण ट्रोल केलं जात आहे. तर काही जण म्हणत आहेत आरसीबी चांगली कामगिरी करतोय म्हणून असं काहीतरी व्हीडिओ व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबने शेवटच्या क्षणी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मुशीरला मैदानात पाठवून एक मोठं पाऊल उचललं पण तो फक्त तीन चेंडू खेळून खातेही न उघडता बाद झाला. सुयशच्या चेंडूवर तो पायचीत झाला, त्याने रिव्ह्यूही घेतला पण तिसऱ्या पंचांनी तो बाद असल्याचे सांगितले.