Jasprit Bumrah Sanjana Ganesan Viral Video: जसप्रीत बुमराह सध्या भारतीय कसोटी संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण या कसोटीची सुरूवात भारतासाठी अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दरम्यान जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांचा एका मुलाखतीतील व्हीडिओ व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराहसह त्याची पत्नी संजना गणेशनदेखील स्पोर्ट्स अँकर म्हणून इंग्लंड दौऱ्यावर आहे. या इंग्लंड दौऱ्यापूर्वी जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन Who’s The Boss या शो मध्ये मुलाखतीला गेले होते. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरा यांनी एक टॉक शो नुकताच सुरू केला आहे. या शोचा पहिलाच एपिसोड त्यांनी रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्या मुलाखतीचा शेअर केला होता.
रोहित-रितिकानंतर आता हरभजन आणि गीता यांनी बुमराह आणि संजना यांची मुलाखत घेतली आहे. या एपिसोडचा ट्रेलर त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये बुमराहला संजना ट्रोल करताना दिसत आहे आणि हा व्हीडिओ सध्या भलताच व्हायरल झाला आहे.
जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील नंबर वन गोलंदाजांपैकी एक आहे. इतर वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत बुमराहची गोलंदाजी अॅक्शन फारच वेगळी आहे. बुमराह रनअप घेताना हळूहळू धावत येतो, परंतु हायपरएक्सटेंशन आणि रिलीज पॉइंटला येऊन तो इतक्या वेगाने चेंडू टाकतो की, ज्याचा अंदाज घेणं कधीकधी फलंदाजांना कठीण जातं.
व्हायरल व्हीडिओमध्ये बुमराह आणि संजना त्यांच्या लव्ह स्टोरीमधील एक किस्सा सांगत आहेत. यादरम्यान बुमराह सुरूवातीला त्यासंबंधित कायतरी म्हणतो. तितक्यात संजना म्हणते, “जसप्रीत मला म्हणाला; चल आपण पळून जाऊया. यावर मी म्हणाली, पळून जायचंय? तू तर रनअपसाठी पण धावत नाहीस तर माझ्याबरोबर काय पळून येणार तू…” संजना इतकं बोलते आणि हसायला लागते.
भल्याभल्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ असलेला बुमराहला संजनाने एकाच वाक्यावर क्लीन बोल्ड केलं होत. चाहत्यांनी या व्हीडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. संजना आणि जसप्रीत बुमराह यांचं लव्हमॅरेज आहे. क्रिकेटच्या मैदानावरच हे दोघेही एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. कोणालाही खबर न लागू देता बुमराह आणि संजना यांनी लग्न करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. आता संजना आणि बुमराह एका मुलाचे आई-बाबा आहेत. ज्याचं नाव अंगद असं ठेवलं आहे.