महाराष्ट्राच्या कुमार-कुमारी खो-खो संघांचे प्रशिक्षक बनसोडे, चव्हाण यांची भावना

मुंबई : अहमदनगर येथे झालेल्या सराव शिबिरादरम्यान सर्व खेळाडूंची मोट बांधून मार्गदर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांना जेतेपदाची दिशा दाखवल्याचे समाधान आहे, अशी भावना महाराष्ट्राच्या खो-खो संघांचे प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे आणि सचिन चव्हाण यांनी व्यक्त केली.

भुवनेश्वर येथे झालेल्या कुमार-कुमारी (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी बनसोडे यांना प्रथमच एखाद्या राष्ट्रीय संघाला मार्गदर्शन करण्याची संधी लाभली. यापूर्वी त्यांनी राज्य आणि जिल्हा पातळीवर अनेक संघांना प्रशिक्षण दिले होते. मात्र यंदा त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत कुमारांना मार्गदर्शन केले. त्याउलट आतापर्यंत फक्त कुमारांना मार्गदर्शन करणाऱ्या चव्हाण यांच्याकडे प्रथमच महाराष्ट्राच्या कुमारींचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले. या दोघांनीही आपल्यावर जबाबदारी चोख बजावून महाराष्ट्राला सलग सातव्यांदा दुहेरी मुकुट मिळवून दिला. करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर गतवर्षी मार्चपासून खो-खोची मैदाने सुनी पडली होती. त्यामुळे दीड वर्षांनंतर झालेल्या या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेला खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद लाभला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘स्पर्धेसाठी भुवनेश्वरला दाखल झाल्यानंतर तेथील वातावरण उष्ण व दमट असल्याने खेळाडूंची तंदुरुस्ती जपण्याचे आव्हान होते. ओदिशाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात आम्हाला अधिक कडवी झुंज मिळाली, कारण ते तीन महिन्यांपासून त्याच मैदानावर सराव करत होते. मात्र ओदिशावर सरशी साधल्यावर आम्हाला अंतिम फेरीत विजय मिळवू याची खात्री होती. प्रशिक्षकपदाचे दडपण असले तरी खेळाडूंनीही माझ्याशी लवकर जुळवून घेतल्यामुळे यश मिळवणे शक्य झाले,’’ असे बनसोडे म्हणाले. ‘‘अहमदनगरमधील शिबिरात अवघ्या सहा दिवसांत आम्ही मॅटवर बूट घालून सराव केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंच्या संघातील प्रत्येकाच्या कौशल्याप्रमाणे त्याला संधी देणे गरजेचे असते. करोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीतही कुमारींनी जेतेपद मिळवल्याचे समाधान आहे. यापूर्वी असंख्य स्पर्धामधील मार्गदर्शनाचा या वेळी फायदा झाला,’’ असे चव्हाण म्हणाले. याशिवाय भविष्यात खो-खो लीगद्वारे खेळाचा प्रसार व्हावा, अशी इच्छा दोन्ही प्रशिक्षकांनी प्रकट केली.