Kuldeep Yadav On Rohit Sharma IND vs ENG: भारतीय संघ इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत १-०ने पिछाडीवर आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया पुनरागमनाच्या तयारीत आहे. बर्मिंगहम कसोटी सामना २ जुलैपासून सुरू होईल. यापूर्वी कुलदीप यादवने आयपीएलमध्ये खेळताना इंग्लंड दौऱ्यासाठी कशी तयारी केली हे सांगितलं. दरम्यान त्याने रोहित शर्माचाही उल्लेख केला.
भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला २०२१ मध्ये गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो खूप प्रयत्न आणि सरावानंतर मैदानात परतला आहे. कुलदीपने आता खुलासा केला आहे की २०२१ मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्याला त्याची गोलंदाजी अॅक्शन पूर्णपणे बदलावी लागली. तसेच, त्याला फिटनेस आणि ताकदीवर दुप्पट मेहनत घ्यावी लागली जेणेकरून तो टी-२० सामन्यात चार षटकं टाकू शकेल.
कुलदीपने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, शस्त्रक्रियेनंतर बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख फिजिओथेरपिस्ट आशिष कौशिक यांनी त्याला सांगितलं की, त्याच्या जुन्या गोलंदाजी अॅक्शनमुळे त्याच्या पुढच्या पायावर जास्त दबाव येत आहे, ज्यामुळे पुढे जाऊन अधिक धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला कुलदीपने त्याकडे फारसे लक्ष दिलं नाही, पण नंतर त्याने ते गांभीर्याने घेत कानपूरला जाऊन खूप मेहनत घेतली.
कुलदीप म्हणाला, “सुरूवातीला खूप त्रास झाला. जुनी अॅक्शन बदलणं खूप कठीण होतं. लय मिळवण्यासाठी दीड महिना लागला. एखाद दिवशी लय ठिक होती, दुसऱ्या दिवशी पुन्हा गडबड होत असे. पूर्णपणे लय मिळवण्यासाठी मला ६ महिने लागले. कौशिक म्हणाला की त्याची नवीन अॅक्शन फास्ट होती. ज्यामुळे थकवाही वाढला.”
“मला नवीन गोलंदाजी अॅक्शनप्रमाणे गोलंदाजी करण्यासाठी खूप एनर्जी लागायची. मी ४-५ षटकांपेक्षा जास्त षटकं टाकू शकत नव्हतो. माझा रनअप वेगवान होता आणि माझी शैली आक्रमक होती. टी-२० मध्येही ४ षटकं टाकणे कठीण झालं होतं. त्यावेळी टीम इंडियाचा माजी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाई यांनी मला मदत केली.”, कुलदीप पुढे म्हणाला.
कुलदीप यादव तेव्हा भारतीय संघात दाखल झाला होता. रोहितला त्याच एनर्जीमध्ये मोठ्या स्पेल टाकाव्या अशी इच्छा होती. याबाबत बोलताना कुलदीप म्हणाला, “सोहम देसाईने मला तयार केलं जेणेकरून मी माझी एनर्जी वाचवू शकेन आणि कमीत कमी सहा षटकं गोलंदाजी करू शकेन. तुम्ही ऐकलं असेल की सामन्यादरम्यान, रोहित अनेकदा विचारत असे, ‘तू थकत नाहीयेस ना?”
“पण, आता मी ८-९ षटकांचे लांब स्पेल टाकायला सुरुवात केली आहे. मी कसोटी सामन्यांमध्ये १०-१२ षटकंही टाकली आहेत. यासाठी मला ३ वर्षे लागली.”, असं कुलदीप पुढे म्हणाला. कुलदीप यादवला आता दुसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा आहेत.