MLC 2023 Final: मुंबई इंडियन्स फ्रँचायझी टीम एमआय न्यूयॉर्कने अमेरिकेत सुरू झालेल्या नवीन टी२० लीग ‘मेजर लीग क्रिकेट’च्या पहिल्या सत्रात विजय मिळवला आहे. त्यांनी अंतिम फेरीत सिएटल ऑर्कास संघाचा २४ चेंडू राखून सात विकेट्सने पराभव केला. एमआय न्यूयॉर्ककडून या सामन्यात कर्णधार निकोलस पूरनने तुफानी खेळी केली. त्याने अवघ्या ४० चेंडूत शतक झळकावले. पूरणने ५५ चेंडूत १३७ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि १३ षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २४९.०९ होता.
निकोलस पूरन हा मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ३८८ धावा केल्या. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्येचा (नाबाद १३७) विक्रमही पूरनच्या नावावर आहे. एमआय न्यूयॉर्कचा ट्रेंट बोल्ट सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्या नावावर २२ विकेट्स आहेत. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडमच्या सौरभ नेत्रावलकरने सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने नऊ धावांत सहा विकेट्स घेतल्या.
सामन्याचा खरा हिरो ठरलेला निकोलस पूरनची खेळी व्यर्थ गेली का? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याच्या शतकी खेळीने मुंबई न्यूयॉर्कला विजय तर मिळाला मात्र, त्याची ही खेळी रेकॉर्डमध्ये धरली जाणार नाही. त्याने खेळलेल्या या स्फोटक खेळीचा त्याला काहीही उपयोग झाला नाही, कारण त्याच्या टी२० विक्रमात कोणतीही भर पडणार नाही. काय आहे त्यामागील कारण जाणून घेऊ या.
‘या’ कारणामुळे पूरनची खेळी ठरली व्यर्थ
अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटला अद्याप टी२० चा अधिकृत दर्जा न मिळाल्याने हे घडले आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा सदस्य आहे, परंतु आतापर्यंत त्याला क्रिकेटच्या सर्वात मोठ्या संस्थेकडून टी२०चा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे निकोलस पूरनची ही झंझावाती खेळी त्याच्या टी२० क्रिकेट रेकॉर्डमध्ये जोडली जाणार नाही. याबरोबरच, माहितीसाठी की! मेजर लीग क्रिकेटप्रमाणेच, बोर्डाने अबू धाबी टी१०, यूएस मास्टर्स टी१०, ग्लोबल टी२० लीग कॅनडा आणि आयएलटी २० यांसारख्या लीगला आयसीसीकडून मान्यता दिली आहे, परंतु टी२० साठी त्यांनाही अधिकृतपणे दर्जा मिळालेला नाही.
एमआय न्यूयॉर्क संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता
स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचे संघ साखळी फेरीतच बाद झाले. लीग फेरीनंतर, सिएटल ऑर्कास प्रथम, टेक्सास सुपर किंग्स द्वितीय, वॉशिंग्टन फ्रीडम तिसरे आणि एमआय न्यूयॉर्क चौथ्या स्थानावर होते. एमआय न्यूयॉर्कने प्लेऑफमध्ये चमकदार कामगिरी करत त्यांनी एलिमिनेटरमध्ये वॉशिंग्टन फ्रीडमचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी चॅलेंजर सामन्यात टेक्सास सुपर किंग्जची बाहेरचा रस्ता दाखवला. आता फायनलमध्ये लीगचा अव्वल संघ, सिएटल ऑर्कासचा त्यांनी पराभव केला.