मॅच फिक्सिंगचा डाग असलेल्या एस. श्रीशांत याची क्रिकेटमधील पुनरागमनाचा मार्ग काही मोकळा होण्याची चिन्हे नाहीत. श्रीशांतवर याआधीच बीसीसीआयने बंदी घातली आहे. पण त्याची स्कॉटलंडमध्ये खेळविल्या जाणाऱया ट्वेन्टी-२० स्पर्धेत सहभागी होण्याचीही इच्छा बीसीसीआयने मोडून काढली आहे. स्कॉटलंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी श्रीशांतने बीसीसीआयकडे विनंती केली होती. श्रीशांतची ही मागणी देखील बीसीसीआयने फेटाळून लावल्याचे वृत्त आहे. भारतात क्रिकेट खेळण्याचे आपले सारे मार्ग बंद झाल्याने परदेशात क्रिकेट खेळण्यासाठी श्रीशांतने आपले प्रयत्न सुरू केले होते. श्रीशांतने स्कॉटलंडला जाऊन एसोसिएट्स टीमसाठी क्रिकेट खेळण्यासाठीची बोलणी केली होती. श्रीशांतची बोलणी अंतिम टप्प्यात देखील आली होती. त्यानुसार श्रीशांतने बीसीसीआयकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठीची मागणी केली. बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीशांत याला आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरवून त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीशांतला स्कॉटलँडमध्ये क्रिकेट खेळण्यास ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे की नाही, याचे संपूर्ण अधिकार बीसीसीआयकडे आहेत.

 

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱया श्रीशांत याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप सिद्ध झाला होता. याप्रकरणी श्रीशांतसह आणखी दोन खेळाडूंना तुरूंगाची हवा देखील खावी लागली होती. बऱयाच सुनावणीअंती श्रीशांत आणि इतर दोन खेळाडूंची दिल्ली न्यायालयाने सुटका केली होती. पण बीसीसीआयने मात्र श्रीशांतवरील बंदी कायम ठेवली होती.