पीटीआय, सिडनी

एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर साधारण एक लाख चाहते उपस्थित होते आणि यापैकी जवळपास सर्वच भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. विराट कोहलीला बाद केल्यानंतर स्टेडियममध्ये अभ्यासिकेसारखी शांतता पसरली होती. तो अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही, असे विधान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने केले.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान भारताच्या संघाला सहा गडी राखून पराभूत करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. कर्णधार कमिन्स आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू मंगळवारी विश्वचषकासह ऐतिहासिक सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) उपस्थित होते. त्यानंतर कमिन्सने विश्वचषक विजयाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘‘अंतिम सामन्यात कोहलीला बाद केल्यानंतर आम्ही सर्व खेळाडू एकत्र आलो होतो आणि त्या वेळी स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, ‘मित्रांनो प्रेक्षकांना ऐका.’ स्टेडियममध्ये लाखभर भारतीय होते, पण त्यांचा जराही आवाज येत नव्हता. त्या वेळी स्टेडियममध्ये एखाद्या अभ्यासिकेसारखी शांतता होती. तो अनुभव कायम माझ्या लक्षात राहील,’’ असे कमिन्स म्हणाला.

हेही वाचा >>>IND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेलच्या शतकी खेळीपुढे भारतीय गोलंदाज भुईसपाट, पाच गडी राखून ऑस्टेलियाचा रोमहर्षक विजय

‘‘एक चषक जिंकण्यासाठीही खूप मेहनत लागते. मात्र, आम्ही क्रिकेटच्या सर्वच प्रारूपांमध्ये जेतेपद मिळवले आहे. यातूनच आमचे प्रशिक्षक, साहाय्यक आणि खेळाडू किती उत्कृष्ट आहेत हे अधोरेखित होते,’’ असेही कमिन्सने नमूद केले. ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय विश्वचषकाचे सहा वेळा, तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि जागतिक अजिंक्यपद कसोटीचे एकेकदा जेतेपद पटकावले आहे. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘तुम्ही कोणतीही जागतिक स्पर्धा केवळ ११ खेळाडूंसह जिंकू शकत नाही. तुमच्याकडे किमान २५ दर्जेदार खेळाडू असणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटची हीच ताकद आहे. आमचे खेळाडू संधी मिळेल, तेव्हा दमदार कामगिरी करून स्वत:ची छाप पाडण्यासाठी उत्सुक असतात. सातत्याने सामने खेळणे, विजय मिळवत राहणे सोपे नाही. मात्र, मैदानावर उतरल्यानंतर आमचे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज असतात,’’ असे कमिन्सने सांगितले.